खामगावातील व्यावसायिकाची साडेबारा लाखांनी फसवणूक, ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष

By अनिल गवई | Published: May 20, 2024 08:36 PM2024-05-20T20:36:49+5:302024-05-20T20:37:00+5:30

बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

A businessman in Khamgaon was cheated of twelve and a half lakhs, the lure of making profit in trading | खामगावातील व्यावसायिकाची साडेबारा लाखांनी फसवणूक, ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष

खामगावातील व्यावसायिकाची साडेबारा लाखांनी फसवणूक, ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष

खाभगाव : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करून एका व्यावसायिकाला तब्बल साडेबारा लाखांनी गंडविले. हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी तक्रारीवरून बुलढाणा सायबर पोलिसांनी अनोळखी भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, खामगाव शहरातील व्यावसायिक साकेत प्रेम सराफ (४८) रा. अकोला रोड यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर मॉर्गन स्टेनले या नावाने शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीबाबत एका भामट्याकडून विचारणा करण्यात आली. साकेत सराफ यांना भूलथापा देत, शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मोबाइलवरील एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला भाग पाडले. या ॲप्लिकेशनवर अनेकांचे अकाऊंट असल्याने, भामट्यांच्या सांगण्यावरून सराफदेखील शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये सहभागी झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने सराफ यांच्या एका खासगी बँकेच्या खात्यातून आयएमपीएसद्वारे दिलेल्या उदय डिजिटल वे ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कंपनीच्या खात्यात १२ लाख ५५ हजार रुपये शेअर म्हणून गुंतवणूक केले.

त्यानंतर त्यांना कुठलाही नफा मिळत नसल्याने, आपण गंडविल्याची गेल्याची खात्री साकेत सराफ यांना झाली. याप्रकरणी सराफ यांनी बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम ४१९,४२० सहकलम ६६ (क) माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम २००८ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बुलढाणा सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी करीत आहेत.
 

Web Title: A businessman in Khamgaon was cheated of twelve and a half lakhs, the lure of making profit in trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.