समृद्धी महामार्गावर दुभाजकाला धडकून कारने घेतला पेट, दोघांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी
By निलेश जोशी | Published: May 29, 2023 09:34 AM2023-05-29T09:34:23+5:302023-05-29T09:35:01+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावानजीकची घटना: जखमीवर मेहकरमध्ये उपचार सुरू
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजीक असलेल्या दुसरबीड जवळ मेहकरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारी कार दुभाजकाला धडकून अचानक कारने पेट घेतला. त्यात होरपळून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कारमधील तिसरा व्यक्ती अपघातादरम्यान कारच्या बाहेर फेकल्या गेल्याने थोडक्यात बचावला असला तरी तो गंभीर जखमी आहे. हा अपघात २९ मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडला.
मेहकरकडून एमएच ०२-सीआर-१४५९ क्रमांकाची कार ही मुंबई कॅरिडॉरच्या दिशेने जात असताना दुसरबीड गावानजीक ही कार पहाटे ५:४५ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील मिडीयम मधील सिमेंटच्या रस्ता दुभाजकावर धडकली. त्या पाठोपाठ कारने पेट घेतला. त्यात कारमधील दोघा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अजय दिनेश भिलाला (२२, रा. मोहन बडोदिया, जि. शाजापूर, मध्य प्रदेश) हा व्यक्ती अपघातादरम्यान कारच्या बाहेर फेकल्या गेल्यामुळे थोडक्यात बचावला. परंतू तो गंभीर जखमी आहे. त्यास मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
कारने जागेवरच घेतला पेट
अपघातानंतर कारने जागेवरच पेट घेतला. या कारमध्ये डिझेलने भरलेल्या ७ ते ८ कॅन होत्या. कारने पेट घेताच त्यांचाही भडका उडाला आणि कारमधील दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. दरम्यान मृत पावलेल्या या दोघांची अद्याप अेाळख पटलेली नाही.
१० मिनीटात पोहोचली मदत
पहाटे ५:४५ वाजेच्या सुमारास कार अपघात व कारने पेट घेतल्याची माहिती महामार्ग पोलिसांना ५:५० वाजताच्या सुमारास कळाली. त्यामुळे तातडीने एपीआय अरुण बकाल, पोलिस उपनिरीक्षक राजू गायकी, पोलिस हेडकॉन्स्टेबल गोविंदा उबरहंडे, नायक पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, मिलिंद ताकतोडे, विनोद राठोड यांनी अवघ्या दहा मिनीटात अपघातस्थळ गाठले. मात्र तोवर कारमधील दोघांचा आगीत जळून कोळसा झाला होता. जखमी अजय दिनेश भिलाला यास रुग्णवाहिकेद्वारे त्वरित मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत पावलेल्या दोघांचे पार्थिव रुग्णालयात पाठविण्यातआले आहे. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.