युवकाच्या आत्महत्येप्रकरणी कंत्राटदारासह चौघांविरुद्ध गुन्हा
By सदानंद सिरसाट | Published: June 22, 2024 06:06 PM2024-06-22T18:06:47+5:302024-06-22T18:06:54+5:30
जलवाहिनी शेताच्यामध्ये टाकून धमकी दिल्याचा आरोप
नांदुरा : शेतात तीन फूट आतमध्ये रस्ता घेणे, त्यातून जलवाहिनी टाकणे तसेच घरासमोर माती आणून टाकल्याचा जाब विचारणाऱ्या युवकाला धमकी देत शिवीगाळ केल्याने त्याने आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून नांदुरा शहर पोलिसात नांदुरा येथील कंत्राटदार विनीत मोहतासह चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी मृत युवकाच्या वडिलांनी १९ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
जळगाव (जामोद) तालुक्यातील कुरणागाड येथील मृत सुपेश रामेश्वर आटोळे (१८) या युवकाने निमगाव- अलमपूर रोडवरील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ मे रोजी घडली होती. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर १९ जून रोजी मृत सुपेशचे वडील रामेश्वर सीताराम आटोळे (५५, रा. कुरणगाड. ता. जळगाव जामोद) यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार केली.
त्यामध्ये आरोपी विष्णू बाबूराव आटोळे (पाटील), महादेव परमेश्वर कराळे (दोघेही रा. कुरणगाड), कंत्राटदार विनीत मोहता (रा. नांदुरा), जेसीबी चालक (नाव माहीत नाही) या चौघांना मृतक मुलगा सुपेश याने शेतातून तीन फूट आत रस्ता का केला, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याला लोटपाट करून होत असेल ते करून घे, अशी धमकी दिली. काही दिवसानंतर आरोपींनी घरासमोर पिवळ्या मातीच्या ८ ट्रॉल्या टाकल्या. त्याचाही सुपेशने जाब विचारला. तसेच मातीमुळे पावसाळ्यात घरात पाणी घुसेल, असे म्हटले. त्यावर आणखी माती आणून टाकेल, असे खोडसाळपणे बोलून अश्लील शिवीगाळ केली.
तसेच आरोपींनी सिंचनासाठीची जलवाहिनी शेताच्या बांधावरून न टाकता २५ फूट सरळ शेताच्यामधून टाकली. विचारणा केली असता काय करायचे ते करून घे, अशी धमकी दिली. त्यामुळे सुपेश उद्विग्न झाला. चारही आरोपींना कंटाळून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तक्रारीवरून चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ४५२, २९४, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पाटील करीत आहेत. घटनास्थळ हे जळगाव (जामोद) पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्याने गुन्हा त्या ठाण्यात वर्ग होणार असल्याची माहिती आहे.