आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By अनिल गवई | Published: September 2, 2022 09:14 PM2022-09-02T21:14:31+5:302022-09-02T21:14:43+5:30

शहर पोलिसांची कारवाई : पोळ्याच्या दगडफेकीविरोधात रॅली काढणे अंगलट

A case has been registered against MLA Akash Fundkar and his colleagues | आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

खामगाव : पोळ्याच्या मिरवणुकीवर दगडफेकीनंतर पोलिस प्रशासन आणि आमदार आकाश फुंडकर यांच्या उद्भवलेल्या द्वंदाचे अखेर आज गुन्ह्यात रूपांतर झाले. लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आकाश फुंडकर यांनी जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आमदार फुंडकर यांच्यासह इतर ३२ जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

शनिवारी सायंकाळी पोळा फुटल्यानंतर दोन गटात झालेल्या वादातून पोळ्याच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. या दगडफेकीनंतर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याच्या निषेधार्थ आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी बंद पुकारला होता. या बंदच्या समर्थनार्थ आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात शहराच्या मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत जमावबंदी आणि लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणी आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सुमारे ३० ते ३२ जणांविरोधात भांदवि १८८, १३५ अन्वये २ सप्टेंबर रात्री उशीरा गुन्हा नोंदविला. तत्पूर्वी पोलिसांनी दबाव आणून फुंडकर यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदुत्ववादी दोन गणेश मंडळांचे डीजे शहर पोलिस स्टेशनला गुरूवारी जमा केले होते. दरम्यान, पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आकाश फुंडकर यांनी सोमवारी शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचे  आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत खामगावातील एकाही गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्याला प्रत्युत्तर म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी कायदा हातात घेतल्यास पोलिस कायद्यानुसार काम करतील, असा सूचक इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी आकाश फुंडकर आणि इतरांवर कारवाई करण्यात आली.

पोलिस आणि गणेश मंडळांतील वाद चिघळणार !

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक आणि आमदार आकाश फुंडकर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत समझोता न झाल्यामुळे शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

Web Title: A case has been registered against MLA Akash Fundkar and his colleagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.