गव्हाची एक कोटींची रक्कम थकवून व्यापाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल
By अनिल गवई | Published: January 14, 2023 06:00 PM2023-01-14T18:00:36+5:302023-01-14T18:01:12+5:30
गव्हाची एक कोटींची रक्कम थकवून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव (बुलडाणा) : गहू खरेदी केल्यानंतर गव्हाची रक्कम देण्यात सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या अकोट येथील व्यावसायिकाविरोधात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल एक कोटी चार लाख रुपयांच्या फसवणुकीमुळे खामगावातील व्यापारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव येथील व्यावसायिक मनोहर रेतूमल नथ्थानी (६७, रा. सिंधी कॉलनी, झुलेलाल नगर) यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या मालकीचे मनशा ट्रेडर्स आहे.
या ट्रेडर्सच्या माध्यमातून ते व्यापाऱ्यांना आणि पीठ गिरणी मालकांना गहू विकतात. दरम्यान, अकोट येथील पुरूषोत्तम मोहनलाल तापडीया (५८) यांनी नथ्थानी यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी ८९ लाख २६ हजार ५७६ रुपयांचा गहू खरेदी केला. या व्यवहारापोटी तापडीया यांनी ८४ लाख ४४ हजार ३११ रुपये अदा केले. मात्र, उर्वरीत एक कोटी ४ लाख ८२ हजार ५७६ रुपयांची रक्कम देण्यास सतत टाळाटाळ केली. ठराविक मुदतीत ही रक्कम न अदा केल्यामुळे तापडीया यांनी आपली फसवणूक केली, अशी खात्री पटल्याने मनोहर नथ्थानी यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी नथ्थानी यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी तापडीया यांच्याविरोधात भादंवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे करीत आहेत.