पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील युवकाच्या हत्येप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल
By निलेश जोशी | Published: July 12, 2024 10:57 PM2024-07-12T22:57:10+5:302024-07-12T22:58:17+5:30
पैशाचा पाऊस प्रकरणात तीन कारही केल्या जप्त
नीलेश जोशी, बुलढाणा-जानेफळ: पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या येथील दिलीप भिकाजी इंगळे या युवकाचा आर्थिक व्यवहारातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यामुळे १२ जुलै रोजी या प्रकरणात पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवले आहे. सोबतच ५ ही आरोपींना मेहकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जानेफळ येथील इंदिरानगरमध्ये रहाणाऱ्या ज्योती दिलीप इंगळे यांनी २२ जून रोजी पोलिसात तक्रार दिली होती. पैशाचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने तिचे पती दिलीप इंगळे यांना अमोल जयसिंग राजपूत व नेले असून नगर जिल्ह्यातील कोकमठाण तालुक्यात कट रचून पूर्व नियोजन करून जीवे मारण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यावरून ९ जुलै रोजी गुन्ा दाखल झाला होता. प्रकरणात पोलिसांनी संदीप उर्फ बाबुराव सुभाष शेवाळे व योगेश रमेश तोंडे तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील आणखी तिघेजण असे एकूण ५ आरोपींना दि.११ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अटकेतील आरोपींनी दिलीप भिकाजी इंगळे याची हत्या केल्याचे कबूल असल्याचे पोलिसांनी सांगितले. १२ जुलै रोजी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतकाच्या कपड्यावर पटली अेाळख
कर्जत नजीक पोलिसांना मिळालेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हा दिलीप भिकाजी इंगळे याचाच होता का? याबद्दल साशंकता होती त्यामुळे मृतक दिलीप इंगले यांचे नातेवाईक १२ जुलै रोजी कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. मृतदेहाच्या अंगावरील पोलिसांनी जप्त केलेल्या कपड्यावरून तसेच शरीरावर असलेल्या टॅटूचा फोटो नातेवाईकांना दाखविण्यात आल्यानंतर मृतदेह दिलीप भिकाजी इंगळे यांचा असल्याची खात्री पटली. या प्रकरणात गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीन कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आरोपींच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी व्यक्त केली आहे.