अंगावर डिझेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By अनिल गवई | Published: January 29, 2024 02:32 PM2024-01-29T14:32:05+5:302024-01-29T14:32:22+5:30
खामगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयातील घटना
खामगाव: भूमि अभिलेख कार्यालयाकडून त्रास दिल्या जात असल्याचा आरोप करीत खामगाव तालुक्यातील ज्ञानेश्वर लांडे या शेतकऱ्यांने सोमवारी दुपारी डिझेल अंगावर ओतून घेतले. भूमिअभिलेख कार्यालयातच ही घटना घडली. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले.
खामगाव तालुक्यातील आवार येथील ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांच्या मालकीची पिंप्री गवळी येथील गट क्रमांक २९० मध्ये शेती आहे. या शेताच्या सरकारी मोजणीबाबत लांडे यांनी हरकत घेतली. त्या मोजणीत १० फूट रूंद आणि ८० फूट लांब शेती गेल्याची तक्रार करीत भूमिअभिलेख कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, कार्यालयातील संबंधितांकडून प्रतिसाद नसल्याने, शेतकऱ्यांने भूमिअभिलेख कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेतले.
या प्रकारामुळे भूमि अभिलेख कार्यालयात एकच गोंधळ उडाला. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू असतानाच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी उपस्थितांनी शेतकऱ्याला पुढील गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.