बछड्यांना घेऊन मादी बिबट पसार, वन विभागाची करडी नजर
By संदीप वानखेडे | Published: March 23, 2024 04:13 PM2024-03-23T16:13:48+5:302024-03-23T16:14:44+5:30
सध्या मादी बिबट आपल्या तिन्ही बछड्यांना घेऊन खांडवा शिवाराकडे गेल्याचे वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये दिसत आहे़.
माेताळा /धामणगाव बढे : ब्राह्मंदा शिवारातील शेतामध्ये बिबट्याचे तीन बछडे शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना २१ मार्च रोजी आढळून आले होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशत पसरली होती. वन विभागाने या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र, सध्या मादी बिबट आपल्या तिन्ही बछड्यांना घेऊन खांडवा शिवाराकडे गेल्याचे वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये दिसत आहे़.
शेतामध्ये बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे समजताच प्रथम ते वाघाचे असल्याचे अफवा पसरली होती. त्यानंतर तत्काळ वन विभागाचे पथक तिथे दाखल झाले हाेते. हे बछडे वाघाचे नसून बिबट्याचे आहेत, असे वनविभागाने स्पष्ट केले हाेते.
परिसरातील लोकांनी बछड्यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गर्दी पाहून परिसरात असलेला मादी बिबट्या आक्रमक होऊ शकतो, यासाठी तिथे गर्दी करणाऱ्या लोकांना वन विभागाच्या तसेच पोलिसांच्या वतीने सतर्क करण्यात आले.
वनविभागाने लावले कॅमेरे
वन विभागाचे पथक आपल्या साहित्यासह २१ मार्चपासून घटनास्थळी ठाण मांडून होते. बछडे आढळलेल्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोताळा वन विभागाचे वनपाल सुधीर जगताप, वनरक्षक संदेश कुलट, वनरक्षक तराड, वन कर्मचारी विनोद ससाने यांनी सहभाग घेतला.
धामणगाव बढे पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस कॉन्स्टेबल सुरज रोकडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या कॅमेऱ्यांमध्ये मादी बिबट आपल्या बछड्यांसह खांडवा शिवाराकडे गेल्याचे दिसत आहे़ मात्र, ते परत ब्राम्हंदा शिवारात येवू शकते़ त्यामुळे, धाेका अजुनही कायम आहे़.