गुजरातमधील दरोडेखोरांची टोळी जेरबंद; खामगाव, यवतमाळ, अकोल्यात केले होते गुन्हे
By निलेश जोशी | Published: March 20, 2023 07:12 PM2023-03-20T19:12:17+5:302023-03-20T19:12:43+5:30
खामगाव, यवतमाळ, अकोल्यात गुन्हे करणाऱ्या गुजरातमधील दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे.
बुलढाणा : गुजरातमधून येऊन विदर्भात दरोड्याच्या गुन्ह्यासह बॅग लिफ्लिटंग करत रोख रक्कम चोरण्यात तरबेज असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सोबतच विदर्भात आगामी १५ दिवस थांबून गुन्हे करण्याच्या ते तयारीत होते असे पोलिसांच्या तपासात समोर आले. या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली असून, ७ जण अंधाराचा फायदा घेत शेगाव मधून फरार झाले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अजयकुमार अशोकभाई तमंचे (४२), जिग्नेश दिनेश घासी (४४) आणि रितीक प्रवीण बाटुंगे (२३, सर्व रा. कुबेरनगर, अहमदाबाद (गुजरात) यांचा समावेश आहे. त्यांचे सात सहकारी १७ मार्च रोजी अंधाराचा फायदा घेत शेगाव येथील आनंद सागर लगतच्या पट्ट्यातून पसार झाले. पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
खामगाव शहरात १६ मार्च रोजी गांधी चौकात एका व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाख रुपये चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात एक कार व एका दुचाकीवर सहा व्यक्तींनी पाठलाग करत खामगावातील त्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे पळवल्याचे समोर आले होते. गोपनीय महिती व तांत्रिक विश्लेषणानंतर या आरोपींनी अकोला आणि यवतमाळ येथेही बॅगलिफ्टिंग केल्याचे समोर आले होते. आरोपींच्या शोधासाठी खामगाव, शेगाव येथे लॉज, रेल्वे स्टेशनसह संशयितांची तपासणी स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेगाव येथे पेट्रोलिंग करत असताना आनंद सागर परिसरात दुचाकी व एका कारसह काही जण संशयितरीत्या थांबलेले असल्याचे समोर आले होते. त्या आधारावर या पथकाने तेथे जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले होते. वाहनाची तपासणी केली असता त्यात लोखंडी टी की, दोन चाकू, चार पेचकस, कैची, मिरची पावडर नगदी ८५ हजार ८०० रुपये व अन्य साहित्य मिळून आले. पोलिसांनी जीजे-१-आरअेा-६८८२ क्रमांकाची कार आणि एमएच-३०-बीपी-४२१८ क्रमांकाची दुचाकीसह ६ लाख ७६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.