बुलढाणा-जामनेर बस राजुर घाटात उलटली; ४० प्रवासी बचावले, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
By भगवान वानखेडे | Published: February 23, 2023 05:52 PM2023-02-23T17:52:00+5:302023-02-23T17:52:11+5:30
बुलढाणा-जामनेर बस राजुर घाटात उलटल्याने मोठा अपघात झाला.
बुलढाणा : चाळीस प्रवाशांना घेऊन जामनेरकडे निघालेल्या बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता राजूर घाटात घडली. यामध्ये तब्बल ३५ ते ४० प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, सुदैवाने या अपघातात ४० प्रवासी बचावले आहे.
जामनेर आगाराची बस क्रमांक (एमएच-४०-एन-९०९७) बुलढाण्याहून ३५ ते ४० प्रवासी घेऊन जामनेरकडे दुपारी साडेचार वाजता दरम्यान निघाली होती. दरम्यान राजूर घाटातील एका वळणार बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या नालीवर जाऊन उलटली. या अपघातात बससमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, काही प्रवाशांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून, बससचे मात्र नुकसान झाल आहे. अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा आढावा घेतला.
राजुर घाटात वाहतूककोंडी
दुपारी घडलेल्या या अपघातामुळे राजुर घाटात दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत ही विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.