ऐतिहासिक शांती महोत्सवाची शांततेत सांगता

By अनिल गवई | Published: November 6, 2023 05:51 PM2023-11-06T17:51:30+5:302023-11-06T17:56:26+5:30

कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरुवात झाली.

A peaceful conclusion of the historic Shanti Mahotsav | ऐतिहासिक शांती महोत्सवाची शांततेत सांगता

ऐतिहासिक शांती महोत्सवाची शांततेत सांगता

खामगाव येथील शांती महोत्सवाची सोमवारी भक्तीभावाने सांगता झाली. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मिरवणुकीला जलालपुरा येथून प्रारंभ झाला. मिरवणुकीद्वारे हजारो भाविकांनी मोठी देवीला श्रध्देचा निरोप दिला. विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरुवात झाली. शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरात्रोत्सव मंडळासोबतच विविध ११७ मंडळांनी मोठी देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दरम्यान, अकरा दिवसांच्या पूर्जाअर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी मोठी देवीजवळ होमहवन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान, जलालपुरा भागातून मोठी देवीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

जगदंबा रोड, मेनरोड, गांधी चौक, अकोला बाजार, जनता बँक, परत जगदंबा रोड, भुसावळ चौक, मोठा पूल मार्गे दुपारी अडीच वाजता ही मिरवणूक सतीफैलात पोहोचली. याठिकाणी मोठी देवीची सामूहिक आरती करण्यात आली. काही वेळाच्या विसाव्यानंतर साडेतीन वाजताच्या सुमारास मोठी देवीच्या मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. ठक्कर ऑइल मिल, शिवाजीनगर, मोठा पूल, सरकी लाइन, मेनरोड, फरशी, सराफा पोस्ट ऑफीस, राणा गेटजवळून पुरवार गल्ली, शिवाजी वेस, सत्यनारायण मंदिर, घाटपुरी नाका, छोटी देवी मंदिर, जगदंबा संस्थानमार्गे घाटपुरी नदीच्या पुलापर्यंत पोहाेचून तेथून बायपासमार्गे उशिरा रात्री जनुना तलाव येथे देवीचे विसर्जन करण्यात आले. आई जगदंबेला (मोठी देवी) श्रध्देचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

गांधी चौकात मिरवणुकीचे स्वागत!

शहरातील गांधी चौकात मोठी देवीचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी वंदे मातरम् मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

प्रसादाचे वितरण
गांधी चौकात वसंत महाराज अन्नकुटी परिवार आणि श्री शिव जगदंबा उत्सव मंडळाच्यावतीने प्रसादाचे वितरण करण्यात आले. या प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

सतीफैलात अनेकांना तरळले अश्रृ!
सती फैलात स्थानिक भाविकांच्यावतीने देवीच्या पहिल्या ठाण्यावर खणानारळाची ओटी भरण्यात आली. हा क्षण डोळ्यात साठवणाऱ्या भाविकांच्या डोळ्यात अक्षरक्ष: अश्रू तरळले. जगदंबा विसर्जन मिरवणुकीत शहरातील ४५ सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळाने सहभाग घेतला.

Web Title: A peaceful conclusion of the historic Shanti Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.