विष प्यायला, उपचार न घेताच पळून गेला; रुग्णालय प्रशासनाची उडाली तारांबळ
By अनिल गवई | Published: June 1, 2024 04:33 PM2024-06-01T16:33:56+5:302024-06-01T16:34:46+5:30
विषारी द्रव्य प्राशन केल्याने पेंडका पातोंडा येथील एका ३० वर्षीय इसमाची प्रकृती अत्यवस्थ झाली.
अनिल गवई, खामगाव: विषारी द्रव्य प्राशन केल्याने पेंडका पातोंडा येथील एका ३० वर्षीय इसमाची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्याला नातेवाईकांनी सामान्य रूग्णालयात शनिवारी पहाटे उपचारासाठी भरती केले. मात्र, उपचार न करताच संबधित रूग्ण निघून गेला. त्यामुळे सामान्य रूग्णालयात एकच खळबळ माजली होती.
प्राप्त माहितीनुसार, राहुल समाधान तायडे या इसमाने उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आला. मध्यरात्री त्याला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचार न घेताच रूग्णाने सामान्य रूग्णालयातून पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे सामान्य रूग्णालयात चांगलीच तारांबळ उडाली असून, काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे एक रूग्ण उपचाराशिवाय निघून गेला होता.