लोणार येथे पोलिसांची दुचाकी रॅली ‘माझी माती, माझा देश’हे अभियानाची केली जागृती
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 13, 2023 03:57 PM2023-08-13T15:57:30+5:302023-08-13T15:57:40+5:30
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक पोलिस प्रशासनाकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान शहरात राबविण्यात येत आहे.
लोणार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक पोलिस प्रशासनाकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान शहरात राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करून रविवारी लोणार येथे पोलिसांनी दुचाकी रॅली काढून अभियानाची जागृती केली.
९ ते २० ऑगस्ट २०२३ दरम्यान हे अभियान तालुका, शहर, गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, तहसिल, नगर पालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती क्षेत्रात आयोजित करण्यात येणार आहे. शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना नमन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, नगर पालिकामध्ये ‘शिलाफलक’(स्मारक) उभारण्यात येणार आहे. त्यावर स्थानिक शहीद, वीर, स्वातंत्र्य सैनिकांची नावे असतील. हे शिला फलक १५ ऑगस्टपर्यंत उभारण्यात येतील.
तसेच ‘वसुधा वंदन’ उपक्रमात प्रत्येक गावात योग्य ठिकाण निवडून तेथे ७५ देशी रोपांची लागवड करून ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. देश स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या वीरांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गतवर्षी प्रमाणे ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्टदरम्यान पुन्हा एकदा राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक निमिश मेहेत्रे यांनी केले आहे.
या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी होण्यासाठी पोलिस निरीक्षक निमिश मेहेत्रे यांच्या नेतृत्वात पोलिस प्रशासनाने शहरातून दु चाकी रॅली काढून शहरवासियांना आवाहन करण्यात आले. या दुचाकी रॅलीमध्ये पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार सहभागी होते.