अर्धवट पुलामध्ये पडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
By सदानंद सिरसाट | Published: September 3, 2022 11:34 PM2022-09-03T23:34:55+5:302022-09-03T23:38:52+5:30
बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष : वरवट बकाल - बावनबीर रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट एकलारा
बानोदा : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर ते एकलारा दरम्यानच्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने त्यामध्ये पडून पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरही दुरूस्ती किंवा फलक न लावल्याने हा अपघात झाला. त्यामुळे बांधकाम विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
तामगाव ठाण्यात कार्यरत जळगाव जामोद येथील रहिवासी बीट जमादार संतोष राजपूत (३८) हे त्यांच्या एमएच-२८, एके-२२७७ क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. या पुलाजवळ सूचनादर्शक फलक नसल्याने त्यांना पूल अर्धवट असल्याचे समजले नाही. त्यामुळे ते पुलावरून खाली पडून अपघात झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. बांधकाम विभागाने कमालीचे दुर्लक्ष केल्याने पुलाने एक जीव घेतला.