देव तारी त्याला कोण मारी; एअरबॅग उघडल्याने बचावला चालक, खामगावमधील घटना
By अनिल गवई | Published: September 27, 2022 07:53 PM2022-09-27T19:53:23+5:302022-09-27T20:13:57+5:30
टायर फुटल्याने भरधाव प्रवासी कारची चारही चाके झालीत वर!
खामगाव: टायर फुटल्याने एक भरधाव प्रवासी कार उलटली. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान खामगाव-शेगाव रस्त्यावरील मानवधर्म आश्रमाजवळ घडली. या घटनेत सुदैवाने एअर बॅग उघडल्याने कार चालक बालंबाल बचावला. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या ओळीचा प्रत्यय यावेळी अनेकांनी अनुभवला.
मंगळवारी सायंकाळी एमएच २८ एझेड ३१८८ क्रमांकाची कार शेगाव येथून खामगाव येथे येत होती. दरम्यान, कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटले. प्रवासी कारने गतीरोधकाला धडक देत, एक-दोन पलट्या खाल्ल्या. त्यानंतर कारचे चारही चाके वर होऊन झालेल्या अपघातात कारच्या एअर बॅग उघडल्याने चालक बालंबाल बचावला.
या घटनेची माहिती मिळताच रमेश भामोदकर आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. कारचालकाला सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून बाजूला केली. भीषण अपघातात चालकाला किरकोळ इजा देखील झाली नाही. त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून चालक बचावल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती.