रेतीची अवैध वाहतुक करणारे टिप्पर पाठलाग करून पकडले
By संदीप वानखेडे | Published: January 28, 2024 04:56 PM2024-01-28T16:56:08+5:302024-01-28T16:57:48+5:30
मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव येथे अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी एक महसूलचे पथक स्थापन केले आहे.
डोणगाव : रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर महसूलच्या पथकाने २८ जानेवारी राेजी पकडला़ हा टिप्पर डाेणगाव पाेलिस स्टेशनला लावण्यात आला आहे़ विशेष म्हणजे महसूलच्या पथकाने पाठलाग करून टिप्पर जप्त केला आहे.
मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव येथे अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी एक महसूलचे पथक स्थापन केले आहे. या पथकामध्ये तहसीलदार भूषण पाटील, मंडळ अधिकारी बी. बी. वाघ, तलाठी अमोल राठोड, तलाठी अनुप नरोटे, बळीराम मानवतकर, संदीप परमाळे यांचा समावेश आहे.
या पथकाला गुप्त माहिती मिळाली की मेहकरवरून डोणगावकडे एक अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर येत आहे़ त्यावरून डोणगाव बसस्थानकावर असणारे पथक सक्रिय झाले. त्यांनी सदर टिप्परचा पाठलाग करून सिनेस्टाइल सदर टिप्पर डोणगावजवळील मादणी फाट्याजवळ पकडला व हा टिप्पर डोणगाव पोलिस स्टेशनला आणून लावण्यात आला आहे. या टिप्परचा क्रमांक एमएच २८ बीबी ४१७५ असा आहे़ टिप्परमध्ये जवळपास पाच ब्रास रेती आढळून आल्याचे तलाठी अमोल राठोड व अनुप नरोटे यांनी सांगितले. या टिप्परवर दंडात्मक कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले़