बुलढाण्यात बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही!

By विवेक चांदुरकर | Published: June 13, 2024 01:22 PM2024-06-13T13:22:03+5:302024-06-13T13:22:48+5:30

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम चिचारी येथील प्रकार

A water tank collapsed while construction was underway in Buldhana; Fortunately no casualties! | बुलढाण्यात बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही!

बुलढाण्यात बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही!

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, संग्रामपूर: नव्याने बांधकाम सूरू असलेली पाण्याची टाकी कोसळल्याची घटना बुधवारी रात्री तालुक्यातील लाडणापूर गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली ही टाकी कोसळल्याचा आरोप होतो आहे. या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाय्रांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रात्रीच्या वेळी टाकी कोसळल्याने जीवित हानी झाली नाही.

जल जविन मिशन योजनेअंतर्गत आदिवासी ग्राम चिचारी येथे १ लाख ५० हजार लिटर क्षमतेची गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. टाकीच्या बांधकामाची किंमत २९ लाख ७५ हजार ६७५ रुपये एवढी आहे. डिसेंबर २०२३ पासून या टाकीचे बांधकाम सुरू असून सद्यास्थितीत अंतिम चरणात आले होते. ही टाकी समुद्रसपाटीपासून १२ मीटर उंच आहे. या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पुर्ण होण्याअगोदरच संपूर्ण टाकी जमिनदोस्त झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात लाडणापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या सोबत वारंवार संपर्क साधून सुद्धा ते उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सुदैवाने पुढील अनर्थ टळला

या १ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे बांधकाम वस्ती वाड्या पासून काही अंतरावर मोकळ्या जागेत सुरू आहे. वर्दळीचे ठिकाण अथवा वस्ती वाड्या जवळ तसेच दिवसा काम सुरू असताना हि टाकी कोसळली असती तर प्रचंड मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. वस्तीच्या बाहेर मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी पाण्याची टाकी कोसळण्याची घटना घडल्याने पुढील अनर्थ टळला.

टाकीचे बांधकाम नियमानुसार सुरू होते. या घटनेची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असून टाकी कोसळण्याचे कारण चौकशीअंती समोर येणार आहे.
-यु. आर. कोरडे, शाखा अभियंता, पंचायत समिती संग्रामपूर

Web Title: A water tank collapsed while construction was underway in Buldhana; Fortunately no casualties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.