ऑनलाइन नोट्स ऑर्डर करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी महिलेची दोन लाखाने फसवणूक
By भगवान वानखेडे | Published: March 3, 2023 05:01 PM2023-03-03T17:01:46+5:302023-03-03T17:01:51+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याची २ लाख २ हजार ९५० रुपयांनी फसवणूक झाली.
बुलढाणा :
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याची २ लाख २ हजार ९५० रुपयांनी फसवणूक झाली. हा प्रकार २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवसांत घडला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा शहरातील इतापे लेआऊट भागातील रहिवासी प्रमोद महादेव वावगे (५७) यांनी सायबर पोलीस स्टेशमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी पुजा प्रमोद वावगे या मलकापूर तालुक्यातील उमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्या पुढील शिक्षणासाठी अभ्यास करीत असून, त्यांनी अभ्यासाकरिता ऑनलाइन नोटस ऑर्डर केल्या होत्या. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरुन फोन येऊन ‘आपका पार्सल रुका हुआ है, अगर आपको छुडना है तो मै भेज रहा हू उस लिंकपर अभी छह रुपये ट्रान्सफर किजीए’ असे हिंदीतून सांगितले. यावरुन पुजा वावगे यांनी सहा रुपये ट्रान्सफर केले असता वावगे यांच्या एसबीआयच्या खात्यातून २ हजार ९५० रुपये आणि युनियन बॅंकेच्या खात्यातून एक लाख असे एक लाख २ हजार ९५० रुपये २८ फेब्रुवारी रोजी तर १ मार्च रोजी युनियन बॅंकेच्या खात्यातून १ लाख रुपये असे एकुण २ लाख २ हजार ९५० रुपये परस्पर काढून घेतले. अशा तक्रारीवरुन अज्ञांताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ऑनलाइन कम्प्लेंट ॲप्सवर तीन रुपये ट्रान्सफर करताच खात्यातून १ लाख लंपास
मलकापूर येथील सुनिल दादाराव देशमुख (५१) यांच्या मुलीने ऑनलाइन खरेदी केलेला टॅब पसंत न आल्याने तो परत करण्यासाठी गुगलवरील जागो ग्राहक जागो या कंन्झ्युमर कोर्ट वेबसाईटचा नंबर शोधला. त्यावर कॉल केला असता अनोळखी व्यक्तीने ऑनलाइन कम्प्लेंट नावाचे ॲप पाठवून त्यावर देशमुख यांच्या बॅंक खात्याची माहिती भरुन घेतली. दरम्यान ऑनलाइन तीन रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. तीन रुपये ट्रान्सफर करताच त्या सायबर भामट्याने आधी ९९ हजार नंतर १ हजार असे एकुण १ लाख रुपये काढून घेतले. तक्रारीवरुन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांत तीन घटना
१ ते ३ मार्च दरम्यान जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीच्या तीन घटना घडल्या असून, जिल्ह्यात हे प्रमाण वाढत आहे.