धरणगावात दगडाने ठेचून युवकाची हत्या, मृतक मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा
By सदानंद सिरसाट | Updated: June 14, 2024 14:49 IST2024-06-14T14:48:16+5:302024-06-14T14:49:27+5:30
शुक्रवारी सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास काहीजण शौचास जात असताना गावातील खंडोबा मंदिरानजीक खुल्या सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला.

धरणगावात दगडाने ठेचून युवकाची हत्या, मृतक मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा
मलकापूर (बुलढाणा) (हनुमान जगताप) : तालुक्यातील धरणगावात दगडाने ठेचून २१ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक पाचारण केले आहे.
शुक्रवारी सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास काहीजण शौचास जात असताना गावातील खंडोबा मंदिरानजीक खुल्या सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर आदींसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना मंदिराजवळील सभागृहात रक्ताचा सडा व दक्षिणेस युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशातील मोबाइलवर संपर्क केल्याने त्याची ओळख पटली.
मृतकाचे नाव दीपक सुधाकर सोनोने (२१, रा. डिडोळा, ता. मोताळा) असे आहे. या घटनेत मृतकाला दगडाने किंवा काठीने जबर मारहाण केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल ३० फूट मृतदेह मारेकऱ्यांनी फरफटत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले.
या घटनेत मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या त्या युवकाची हत्या आपल्या गावात कशी? या प्रश्नामुळे धरणगावात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ स्थानिक तिघा संशयितांना ताब्यात घेतले. बुलढाणा येथील श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिस तपास करीत आहेत.