बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीला मुहूर्त मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 03:03 PM2020-01-07T15:03:30+5:302020-01-07T15:04:27+5:30
आरोग्य संस्थांमध्ये सुरू होणारा बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बालकांची जन्मत: आधार नोंदणी करण्याची सुविधा १ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार होती. परंतू यासाठी आरोग्य संस्थेमध्ये नियूक्त केल्या जाणारी एक परिचारीका व लिपीकवर्गिय कर्मचाऱ्यांची आतापर्यंत परीक्षाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा हा उपक्रम लांबणीवर पडल्याने बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीला मुहूर्त केंव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड महत्त्वाची ओळख झालेली आहे. नवीन जन्मलेल्या बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आधार नोंदणी आवश्यक आहे. जन्मल्यानंतर बाळाचे अवघ्या काही तासांत आधार नोंदणी व्हावी, यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा, उपजिल्हा, स्त्री व ग्रामीण अशा आरोग्य संस्थांमध्ये बालकांच्या आधार नोंदणीची ही सुविधा १ जानेवारी २०२० पासून उपलब्ध करून देण्यात येणार होती. सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी आरोग्य विभागाचा हा उपक्रम फायद्याचा आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत परीक्षा घेऊन एक परिचारीका व लिपीकवर्गिय कर्मचारी आधार नोंदणीसाठी नियूक्त करण्यात येणार होते. प्रत्येक एका नोंदणीला या कर्मचाऱ्यांना २७ रुपये मानधन दिले जाणार आहे. हे १०० रूपयांपर्यंत देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. त्यांना हे मानधन प्रोत्साहन म्हणून दिले जाणार असल्याची माहिती आहे. परंतू आतापर्यंत जिल्ह्यात परिचारीका व लिपीकाची परीक्षाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आरोग्य संस्थांमध्ये सुरू होणारा बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. यासाठी आरोग्य विभाग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाच्यावतीने चार दिवसांचे प्रशिक्षण प्रक्रिया मागील महिन्यात पार पडली. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी वैद्यकीय अधिकाºयांसह दोन कर्मचाºयांचा यात समावेश आहे.
नववर्षाचा योग हुकला
आधार नोंदणी करण्यासाठी हाताचे ठसे, डोळ्यांचे बाहुलींची प्रतिमा आणि ओळखपत्र अशी कागदपत्रे लागतात. मात्र, आरोग्य विभागाने बाळ जन्मल्यानंतर त्याला रुग्णालयातच आधार कार्ड देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्वसामान्य पालकांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. ही सुविधा रुग्णालयांमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर सुरू होणार होती. परंतू आरोग्य विभागाचा नववर्षाचा योग हुकला.
नवजात बालकांची जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात आधार नोंदणी करण्याची सुविधा जवळपास दोन महिन्यात सुरू होईल. सध्या यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी परीक्षेला बसलेले आहेत. जिल्ह्यातून प्रत्येक इन्स्ट्यूटचे दोन कर्मचारी ही परीक्षा देत आहेत.
- डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.