सातपुड्याच्या पर्वतरांगेत आमीरचं सपत्नीक श्रमदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 06:33 PM2018-04-23T18:33:54+5:302018-04-23T18:38:00+5:30
आदिवासी बांधवांशी आमीरचा संवाद
खामगाव: संग्रामपूर तालुक्यातील सालबन येथे सातपुड्याच्या पर्वतरांगेत आमीरनं सोमवारी सपत्नीक श्रमदान केलं. यावेळी आमीर खाननं आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि जलसंधारणासाठी त्यांनी सुरू केलेल्या कामाची प्रशंसा केली.
पाणी फाऊंडेशननं ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील विविध गावे सहभागी झाली आहेत. संग्रामपूर तालुकासुद्धा यामध्ये सहभागी झाला आहे. संग्रामपूर तालुक्यात विविध ठिकाणी जलसंधारणाची कामं सुरू आहेत. सातपुड्याच्या कुशीतील सालवन येथील रेमूच्या नेतृत्वात झालेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आमीर खान सोमवारी सालवन येथे पोहोचला. यावेळी प्रशासनातर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, एसडीओ गोगटे आदी उपस्थित होते.
बुलडाणा अर्बनचे संचालक आणि भारतीय जैन संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. किशोर केला यांनी आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांची भेट घेत जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामांची माहिती दिली. बुलडाणा अर्बनव्दारे पाणी फाउंडेशन स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यातील १०६ गावांना श्रमदानासाठी लागणारं साहित्य पुरवण्यात आलं आहे.