आणेवारी ४८ पैसे, तरीही विमा मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:28+5:302021-01-08T05:51:28+5:30
राहेरी बु : सिंदखेड राजा तालुक्यातील सातही महसूल मंडलात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांमध्ये ओला दुष्काळ जाहीर ...
राहेरी बु : सिंदखेड राजा तालुक्यातील सातही महसूल मंडलात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या गावांमधील पिकांचा पंचनामा करण्यात आला असूनही अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे पीक विमा तत्काळ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जेन, साखरखेर्डा, किनगांव राजा, सोनुषी आणि सिंदखेड राजा ही सात महसूल मंडले तालुक्यात आहेत. यामध्ये साखरखेर्डा, सोनुषी व शेंदुर्जेन या मंडलात सर्वाधिक पाऊस पडल्याने सोयाबीन, कपाशी ही पिके उद्ध्वस्त झाली होती. हीच परिस्थिस्ती दुसरबीड, मलकापूर, पांग्रा, किनगाव राजा, सिंदखेड राजा याही मंडलात होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हिरवा दाणा असतानाच कोंब फुटले होते. सोयाबीन पिकाला लागलेल्या शेंगा काळ्या पडल्याने दाणेही काळे पडले. त्यामुळे हेक्टरी चार क्विंटलच्या आतच सरासरी निघाल्याने पेरणी, डवरणी, बी फवारणी, खते काढणी, मळणी याचा सरासरी हिशोब केला तर मजुरी सोडाच झालेला खर्चही निघाला नाही. याच पिकांच्या उत्पन्नावर पुढील गहू, हरभरा, मका या रब्बीच्या पिकांचा खर्च अवलंबून असतो. मात्र, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले. तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांपैकी २५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. सिंदखेड राजा तालुक्यातील १०५ गावांमधील आनेवारी ही पन्नास टक्केपेक्षा कमी असताना, शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधीही पाठपुरावा करताना दिसत नाहीत. केवळ खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून त्यांनाच विमा कंपनीने मदत केली. मात्र, इतर शेतकऱ्यांना अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. खरीप पिकांचा विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या विम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र तालुक्यात आहे.
दुसरबीड मंडलामध्ये पाऊस जास्त झाल्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. आणेवारी ४८ पैसे असल्यामुळे पीक विम्याचा तातडीने लाभ मिळावा.
एकनाथराव देशमुख, शेतकरी, राहेरी बु.