अबब...पोलिस पाटलाच्या ताब्यातील रेतीसाठ्याची चोरी
By सदानंद सिरसाट | Published: July 8, 2023 07:16 PM2023-07-08T19:16:08+5:302023-07-08T19:16:39+5:30
नांदुरा (बुलढाणा) : खेडगाव शिवारातील अवैध रेतीचा साठा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी जप्त करून ताे पोलिस पाटलाच्या ...
नांदुरा (बुलढाणा) : खेडगाव शिवारातील अवैध रेतीचा साठा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी जप्त करून ताे पोलिस पाटलाच्या ताब्यात दिला होता. त्यानंतर ७ जुलै रोजी तो साठा चोरीला गेल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी प्रभारी तहसीलदार ए. एस. नारखेडे यांच्यामार्फत मंडल अधिकारी महादेव डांबरे यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार ६ जुलै रोजी तहसील कार्यालय मलकापूर, नांदुरा व जळगाव जामोद येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खेडगाव शिवारात सरकारी गट क्रमांक १८५ मध्ये अवैध मार्गाने चोरून जमा केलेला अंदाजे ५० ब्रास रेतीचा साठा सरकारी किमती प्रमाणे अंदाजे ३० हजार रुपये व पूर्णा नदी पात्रातील काठावर आढळलेले लोखंडी किनी किमत अंदाजे १० हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिला. ७ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलिस पाटील हे घटनास्थळी गेले असता त्यांना साठा दिसून आला नाही. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.
रेती माफियांना अभय कोणाचे
नांदुरा - तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून राजरोसपणे माफिया रेतीची उचल करतात. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. पूर्णा नदी तीरावरील गावामधल्या शासकीय जमिनीवर साठे करून पावसाळ्यात विकतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. वरिष्ठांनी दखल घेतली तर जुजबी कारवाई दाखवण्यात येते. त्यामुळे रेती माफियांची हिंमत वाढली आहे. आता तर महसूल प्रशासनाने जप्त केलेले साठे सुद्धा रातोरात उचलून नेत असल्याचा प्रकार घडला आहे. रेती माफियांना अभय कोणाचे, त्यांचे धारिष्ट का वाढले महसूल व पोलिस कडक कारवाई का करत नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.