साखरखेर्डा कॉपी प्रकरणात अब्दुल अकिल सुत्रधार
By निलेश जोशी | Published: March 15, 2023 06:29 PM2023-03-15T18:29:38+5:302023-03-15T18:30:34+5:30
आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
साखरखेर्डा (जि. बुलढाणा): सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात अब्दुल अकिल अब्दुल मुनाफ हा मुख्यसुत्रधार असल्याची माहिती विशेष पथकाच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान त्याच्यासह पाच जण अद्यापही न्ययालयीन कोठडीत आहे.
या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. हे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले नसले तरी काही हजारांमध्ये ते झाले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
तीन मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यात १२ वीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा होती. याप्रकरणाच्या तपासात बरेच तथ्य समोर आले होते. त्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी अटक सत्र सुरू केले होते तसेच चार शिक्षकांनाही निलंबीत करण्यात आले होते. दुसरीकडे प्रकरणाचे गांभिर्य पहाता जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी विशेष तपास पथक गठीत केले होते. या पथकाच्या तपासात उपरोक्त माहिती समोर आली होती. प्रकरणात लोणार येथील विद्यालयाचा प्राचार्य अब्दुल अकील अब्दुल मुनाफ हा मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच पेपरचे फोटो काढून ज्या काही ठरावीक व्यक्तींशी डिलींग झाले होते त्यांना ते पाठवले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात त्याच्यास गोपाल दामोदर शिंगणे (शेंदुर्जन), किनगाव जट्टू येथील संस्थेचा चालक गजानन आडे, लोणार येथील परीक्षा केंद्रावरील शिक्षक अंकुश पृथ्वीराज चव्हाण, दानिश खा फिरोज खा (शेंदुर्जन) यांना अटक करण्यात आली होती. सध्या हे पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. १३ मार्च रोजी सिंदखेड राजा न्यायालायने त्यांचा जामीनही फेटाळला आहे. दुसरीकडे याप्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भंडारी येथील तीन युवकांना जामीन मिळाला आहे.
सायबरचा एक कर्मचारी मदतीला
या प्रकरणात सायबर पोलिसांचा एक कर्मचारी हा विशेष पथकासोबत तपासात मदत करून असून सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील छुपे दुबे समोर आणण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे साखरखेर्डा पट्ट्यातील काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अवाजवी स्वरुपात शालेय फी आकारण्यात येते अशीही चर्चा आहे.