बुलडाणा जिल्ह्यातील ९१ प्रकल्पामध्ये अवघा साडेतीन टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:55 PM2019-06-07T16:55:59+5:302019-06-07T16:59:45+5:30
वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा साडेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या पाच वर्षातील निच्चांकी पातळीवर जिल्ह्यातील ९१ प्रकल्पातील जलसाठा पोहोचला असून मान्सून तथा मान्सूनपूर्व पावसाने येत्या काळात जिल्ह्यात दमदार हजेरी न लावल्यास पाणीटंचाईची दाहकता संपूर्ण जिल्ह्यालाच कवेत घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा साडेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१८ अखेर जवळपास ३६ दलघमी पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत करण्यात आले होते. तर वर्तमान स्थितीत प्रकल्पांमध्ये अवघा १८.६५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यावरून शहरी तथा ग्रामीण भागातील पाणी समस्या किती गंभीर बनतेय याची कल्पना यावी. पाणी आरक्षण समितीच्या बैठकीदरम्यानच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास ५० पाणीपुरवठा योजनांनाच अल्प पाणीसाठ्यामुळे पाणी आरक्षण देता आले नव्हते. आता तर प्रकल्पच कोरडे पडले असल्याने समस्या तीव्र बनत आहे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा विचार करता मोठे दोन प्रकल्प, दोन मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहे. ९१ पैकी ६५ पेक्षा अधिक लघू प्रकल्प आज कोरडेठाक पडले आहे आहे. लघु प्रकल्पामध्ये अवघा १.३२ टक्के पाणीसाठा असून २.३१ दलघमी ऐवढाच जलसंचय यात आहे. लघु प्रकल्पांमध्ये ८.२० टक्के पाणीसाठा असून दलघमीमध्ये तो ११.१६ दलघमी आहे. जेमतेम काय मध्यम प्रकल्पातच काय जो पाणीसाठा आहे तो आहे. मोठ्या प्रकल्पामध्ये तर नळगंगा प्रकल्पातच एकमेव उपयुक्त पाणीसाठा आहे. पेनटाकळी, खडकपूर्णा प्रकल्प मृतसाठ्यात गेल असून पेनटाकळीत अवघा ४.८२ दलघमी आणि खडकपूर्णा प्रकल्पामध्ये ८.१६ दलघमीच पाणीसाठा आहे.
(प्रतिनिधी)