बुलडाणा जिल्ह्यात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा मुबलक साठा; मागणीत झाली घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:20 AM2020-12-16T11:20:37+5:302020-12-16T11:22:26+5:30
Remedesivir News जिल्ह्यात सध्या दररोज सुमारे २० इंजेक्शनची गरज पडत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कमी झाली असून, गंभीर रुग्णांचेही प्रमाण जवळपास ८० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचीही मागणी तुलनेने कमी झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात सध्या दररोज सुमारे २० इंजेक्शनची गरज पडत आहे.
जेथे ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात १,१४५ रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा होता तो त्यामुळे आता ७०० वर आला आहे. सोबतच ऑक्टोबरमध्ये जेथे दररोज ३५ इंजेक्शन लागत होते ते आता निम्म्यावर आले असून, दररोज १५ ते २० इंजेक्शनची गरज पडत आहे. थोडक्यात जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यातच जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची एक तक्रार समोर आली होती. त्यामुळे आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पाच सदस्यीय समितीही नियुक्त करण्यात आली होती. या समितीने या प्रकरणात कोविड समर्पित रुग्णालयातील दोषी आढळलेल्या कक्षसेवकास निलंबित करण्यात आले होते. सध्या जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच गंभीर रुग्णांचे प्रमाणही जिल्ह्यात ८० टक्क्यांच्या खाली आले असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
ॲन्टिजन टेस्ट, औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध
जिल्ह्यात वर्तमान स्थितीत रेमडेसिवीर इंजक्शनचा गरजेनुरूप साठा उपलब्ध आहे. अन्य अैाषधसाठाही उपलब्ध असल्याने कोविड समर्पित रुग्णालयात गोंधळाची स्थिती नाही, तसेच जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. आरटीपीसीआर टेस्टला प्राधान्य देण्यात येत असून, रॅपिड टेस्टसाठी किट उपलब्ध आहे. त्याचा तुटवडा नाही. अन्य अैाषधसाठाही जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर आहे.
गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी
सध्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही कमी आहे. त्या उपरही संभाव्या आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने नियोजन केलेले आहे. गरजेनुरूप आवश्यक तेवढा साठा सध्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.