मुबलक पाणीसाठा, वाढत्या थंडीने रब्बी पीक बहरले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:32+5:302021-02-12T04:32:32+5:30
लोणार : तालुक्यात यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीने रब्बी पिकांना चांगला फायदा झाला आहे. त्यात मुबलक पाणीसाठा असल्याने गहू पीक चांगले ...
लोणार : तालुक्यात यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीने रब्बी पिकांना चांगला फायदा झाला आहे. त्यात मुबलक पाणीसाठा असल्याने गहू पीक चांगले बहरलेले आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाच्या उत्पादनात वाढ हाेण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
लोणार तालुक्यातील गावांना हुडहुडी भरवली. तापमानाचा पारा घसरल्याने गहू व हरभरा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे. वाढलेल्या थंडीने गहू, हरभरा पिकांना मोठा फायदा झाला असल्याचे एकंदरीत चित्र तालुक्यात दिसत आहे.
लोणार तालुक्यात मागील महिन्यापासून कडाक्याची थंडी पडत आहे. जोरदार थंडीचा फटका काही द्राक्ष, डाळिंब उत्पादकांना सोसावा लागला. परंतु रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणजे गहू, हरभरा यांना मात्र थंडीचा फायदा झाल्याचे चित्र आहे. रब्बी पिकांना थंडी पोषक असते. थंडीमुळे गहू, हरभरा पिके जोरदार बहरली असून उत्पानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
गहू, हरभरा क्षेत्रात वाढ
लोणार तालुक्यात एकूण रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र १९ हजार १०० हेक्टर आहे. त्या क्षेत्रापैकी ६ हजार १६४ हेक्टरवर गहू पिकाची पेरणी झालेली आहे. हरभरा पिकाची १३ हजार ५३६ हेक्टर वर पेरणी झालेली आहे. यावर्षी गहू व हरभरा पेरणी क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
२०२० मध्ये जोरदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील काही पिकांचे नुकसान झाले होते. तरी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पन्न घेतले आहे.
कोट.......
मुबलक पाणी उपलब्ध असल्याने आणि कडाक्याची थंडी पडल्याने गहू, हरभरा पीक बहरले आहे. यामुळे यावर्षी उत्पादनात वाढ होऊ शकते.
नामदेव मोरे, शेतकरी, हिरडव.