एसी, पॅकबंद शिवशाही बस नको रे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:54+5:302021-04-01T04:34:54+5:30
बुलडाणा : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना प्रवाशांकडून सर्वसाधारण एसटी बसलाच पसंती देण्यात येत आहे. एसी, पॅकबंद शिवशाही बसला मात्र ...
बुलडाणा : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना प्रवाशांकडून सर्वसाधारण एसटी बसलाच पसंती देण्यात येत आहे. एसी, पॅकबंद शिवशाही बसला मात्र प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. या बसचे भाडे जास्त असल्याने ‘शिवशाही बसने प्रवास नको रे बाबा’ अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहेत.
खासगी बसेसप्रमाणेच एसटी महामंडळाच्या बसचाही प्रवास आरामदायक व्हावा व प्रवाशांचा एसटी बसच्या प्रवासाकडे कल वाढावा, या उद्देशाने राज्यभरात शिवशाही एसी, पॅकबंद बससेवा सुरू करण्यात आली आहे. बुलडाणा विभागातही सर्व आगारांमध्ये शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर ऑगस्टमध्ये सर्वसाधारण बसप्रमाणेच शिवशाही बससेवादेखील सुरळीत करण्यात आली होती. शिवशाही बसला प्रवाशांचा प्रतिसादही मिळत होता. मात्र जिल्ह्यात जवळपास महिनाभरापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रवाशांनी शिवशाही बसकडे पाठ फिरविली आहे. इतर बसेसच्या तुलनेत जास्त असलेले प्रवासभाडेही याला कारणीभूत आहे. सर्वसाधारणपणे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून या बसला पसंती मिळत होती. मात्र आता कोरोनामुळे या शहरांकडे जाण्याचा नागरिकांचा कल कमी झाला आहे. यामुळेदेखील शिवशाही बसच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुलडाणा विभागात शिवशाही बससेवा बंद
शिवशाही बसचे प्रवासी भारमान अतिशय कमी असल्याने एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत होता. यामुळे गत १५ दिवसांपासून बुलडाणा विभागातील शिवशाही बससेवा बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रवाशांकडून मागणी करण्यात आल्यास ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तीन महिन्यात उत्पन्नात घट
गेल्या तीन महिन्यांपासून शिवशाही बसच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येत आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी या बसचे उत्पन्न बऱ्यापैकी होते. मात्र महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. यामुळे प्रवासीसंख्या अगदी १० ते १५ टक्क्यांवर आल्याने उत्पन्नात खूप मोठी घट आली आहे.
उन्हाळा असतानाही प्रतिसाद नाही
शिवशाही बस पॅकबंद व वातानुकूलित असल्याने उन्हाळ्यात या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात असलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करताना शिवाशाही बसचे भाडे जास्त असल्याने या बसला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यात जमा असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील शिवशाही बसेसची संख्या : १९
सध्या सुरू असलेल्या शिवशाही बस : ००
बुलडाणा विभागातील सातही आगारातून लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी शिवशाही बस सोडण्यात येत होत्या. या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने अचानक प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला. यामुळे ही सेवा सुरू ठेवणे एसटी महामंडळाला न परवडणारे आहे.
- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक, बुलडाणा
..............................