पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:37+5:302021-05-31T04:25:37+5:30
अमडापूर : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे, खते ...
अमडापूर : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने मान्सून १ जून ते ४ जूनपर्यंत दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. त्या अनुषंगाने शेतकरी येणाऱ्या रब्बी हंगामासाठी तयारीला लागलेला आहे व शेती मशागत कामात व्यस्त आहेत. कोरोना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. या दरम्यान शेतकरी शेतातच काम करून घालवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी गेलेल्या वर्षी पिकलेले सोयाबीन कवडीमोल भावाने विक्री केले. आता मात्र सोयाबीन बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बियाणे घेणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यात भर पडून खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे खते टाकावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या सर्व शेतीला लागणाऱ्या सर्व सामग्रीचे भाव वाढले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गत काही दिवसांपासून परिसरात वादळासह पाऊस हाेत असल्याने मशागतीची कामे खाेळंबली आहेत. परिसरात अनेक शेतकऱ्यांचा भुईमूग पिकाचा खरीप हंगाम संपला आहे. मात्र, भुईमूग शेंगांचे भावदेखील गडगडले असल्याने आपला माल कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र आहे.