बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताच लसीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:27 PM2021-04-06T12:27:08+5:302021-04-06T12:27:23+5:30
Corona Vaccination : आतापर्यंत एक लाख ३१ हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व नागरिकांनी लस घेतली असून, ५७८८१ डोस उपलब्ध आहेत.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. रूग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत एक लाख ३१ हजार आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व नागरिकांनी लस घेतली असून, ५७८८१ डोस उपलब्ध आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने लसीकरणालाही वेग आला आहे.
सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ ते ६० वयोगटातील दुर्धर आजार असलेले नागरिक व ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. आता ४५ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरण करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्याला एकूण एक लाख ८९ हजार लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी ५ एप्रिलपर्यंत एक लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये पहिला डोस ९१ हजार ३८८ नागरिकांना व दुसरा डोस ३८८ नागरिकांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील २०६४६ नागरिकांनी लस घेतली आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील ६२७२३ हजार नागरिकांनी लसीकरण केले आहे. जिल्ह्यात सध्या ५७८८१ डोस उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात काही भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे, तर काही भागात कमी प्रतिसाद मिळत आहे. लसीची मुबलक उपलब्धता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याची गरज आहे.
- डॉ. पंढरीनाथ कांबळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा