पाटील, देशमुख पदवी सोडून मूळ आडनाव स्वीकारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 10:47 PM2017-01-12T22:47:11+5:302017-01-12T22:47:11+5:30

सध्या संपूर्ण जग जागतिकिकरणाकडे जात असून, विज्ञान युगात जातीयतेच्या भिंती तोडून टाकण्याची गरज आहे. त्याकरिता दोन पावलं आपण पुढे येऊन पाटील, देशमुख, जहागिरदार

Accept the original surname, leaving Patil, Deshmukh degree! | पाटील, देशमुख पदवी सोडून मूळ आडनाव स्वीकारा!

पाटील, देशमुख पदवी सोडून मूळ आडनाव स्वीकारा!

Next
- विवेक चांदूरकर/ऑनलाइन लोकमत
 
सिंदखेडराजा (बुलडाणा), दि.12 -  सध्या संपूर्ण जग जागतिकिकरणाकडे जात असून, विज्ञान युगात जातीयतेच्या भिंती तोडून टाकण्याची गरज आहे. त्याकरिता दोन पावलं आपण पुढे येऊन पाटील, देशमुख, जहागिरदार, इनामदार या पदव्या सोडून आपले मूळ आडनाव लावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी समाजबांधवांना केले. 
राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या ४१९ व्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे शिवधर्मपीठावर आयोजित कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर यांनी अध्यक्षस्थानावरून विचार व्यक्त केले. तारखेनुसार व तिथीनुसार राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी अनेक मान्यवरांनी राजवाड्यात जावून जिजाऊंच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर दुपारी विविध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सायंकाळी शिवधर्मपीठावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारपीठावर खासदार छत्रपती संभाजी राजे, माजी आमदार रेखा खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष छाया महाले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव मधुकर मेहकरे, शिवधर्म संसद सदस्य देवानंद कापसे, नेताजी गोरे, चंद्रशेखर शिखरे, विजया कोकाटे, तनपुरे, गंगाधर बनबरे, पप्पू भोयर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष तारक, डॉ. राम मुरकुटे, डॉ. राजीव चव्हाण, गंगाधर महाराज कुरूंदकर, शिवाजीराजे पाटील, हरियाणाचे सुरजित दाभाडे, कर्नाटकवरून आलेले वैजनाथ बिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी बोलताना अँड. खेडेकर म्हणाले की, आता काळ बदलला आहे. त्यानुसार आपल्यालाही बदलावे लागेल. शिवाजी महाराजांनी घोडा व तलवारीने युद्ध लढले. आता मात्र घोडा व तलवारीने युद्ध न करता पेन, शाई व कॉम्प्युटरच्या माध्यमातून युद्ध करावे लागणार आहे. आगामी काळात प्रस्थापितांना लोक धडा शिकविणार असून, शेतकरी व शेतमजुरांचे राज्य येणार आहे. यापुढे मराठय़ांनी पंचसत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. इंजिनियर व डॉक्टर होण्यासोबतच चित्रपट सृष्टी, क्रीडा क्षेत्रातही आपल्या मुलांना सहभागी व्हायला लावा. या क्षेत्रात पैसा व प्रसिद्धी आहे. हे क्षेत्रही काबीज करण्यासाठी मुलांना मदत करा. संपूर्ण राज्यभर मराठय़ांचे मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाला सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. या मोर्चाचे आयोजन करण्यात मराठा सेवा संघाचा कसा सहभाग आहे, हे लिखित स्वरूपात मांडायला हवे, अन्यथा काही वर्षांनी अन्य कुणी याचे श्रेय घेईल. मराठा मोर्चात महिलांचा सहभाग अधिक होता. तो तेवढय़ापुरताच न राहता यानंतरही विविध क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यायला हवा, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. 
सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात प्रतीक्षा हर्षे या मुलीने जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली. त्यानंतर मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे म्हणाले की, मराठा सेवा संघाचा विचार हा केवळ महाराष्ट्रापुरता आता र्मयादित राहिला नसून, देशव्यापी झाला आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष छाया महाले म्हणाल्या की, मराठा मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महिला प्रत्येक मोर्चात अग्रस्थानी होत्या. हे जिजाऊ ब्रिगेडचे यश आहे. वैचारिक अंगाने व सुसंस्कृतपणे महिलांनी आतापर्यंत आंदोलने केली आहेत व यानंतरही आंदोलन करणार असल्याचे महाले यांनी सांगितले. विचारवंत कक्षाचे प्रमुख गंगाधर बनबरे म्हणाले की, आम्ही ज्ञानाचे शस्त्र घेऊन क्रांतीची भाषा करीत आहोत. पूर्वी राजाच्या पोटी राजे जन्माला येत होते, आता नेत्यांच्या पोटी नेते जन्माला येत आहेत. आम्हाला ही परंपरा खंडित करायची आहे. शेतकर्‍यांची, सामान्यांची मुले संसदेत जावी, याकरिता संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्षात रूपांतरीत करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रवक्ता प्रदीप भानुसे यांनी केले. 
जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टीवर ४00 पेक्षा जास्त पुस्तकांची दुकाने थाटण्यात आली होती. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या मूर्तीसमोर दिवसभर नागरिकांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. 
 
शिवराय, शाहू महाराजांच्या विचारांचा वारस - संभाजी राजे भोसले 
महाराष्ट्रालाच नाही तर देशाला समानतेची विचारधारा देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या रक्ताचाच मी वारस नाही तर त्यांच्या विचारांचा वारस असल्याचे प्रतिपादन खा. संभाजीराजे भोसले यांनी केले. ते म्हणाले की, मी बहुजनांची विचारधारा मानणारा आहे. मराठय़ांचा, बहुजनांना आवाज मी संसदेत उचलणार आहे. ज्या घराण्यातून मी आलो त्यांचे विचार देशभर पसरविण्याचे कार्य मी करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे नाव मी दिल्लीत गाजविल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
 
गडकरींचा पुतळा तोडणार्‍यांचा सत्कार 
पुण्यामध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा नुकताच संभाजी ब्रिगेडने तोडला. हा पुतळा तोडणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 
सत्यपाल महाराज यांनी दिली शपथ 
यावेळी संदीपपाल महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी उपस्थितांना दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, हुंडा घेणार नाही, महिलांना त्रास देणार नाही, अशी शपथ दिली. तरूणांनी व्यसनमुक्त होण्याचे आवाहन यावेळी सत्यपाल महाराज यांनी केले. 
 

 

Web Title: Accept the original surname, leaving Patil, Deshmukh degree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.