शव नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात
By Admin | Published: May 15, 2017 12:13 AM2017-05-15T00:13:13+5:302017-05-15T00:13:13+5:30
मलकापूर : शवविच्छेदन केलेला मृतदेह पोहोचविण्याकरिता निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात घडून ३५ वर्षीय चालक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना १४ मे रोजी रात्री निंबारी फाट्यानजीक घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शवविच्छेदन केलेला मृतदेह पोहोचविण्याकरिता निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात घडून ३५ वर्षीय चालक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना १४ मे रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास निंबारी फाट्यानजीक घडला.
एक लग्न सोहळा आटोपून येताना विश्वनाथ नामदेव सोनोने (वय ३९) रा. मूर्ती ता.मोताळा हा इसम धुपेश्वर येथील पूर्णा नदीत आंघोळ करताना पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना १४ मे रोजी दुपारी घडली. या मृतकाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री ८ वाजेच्या सुमारास सदर मृतदेह घेऊन एम.एच.२९ एम.१९३४ या क्रमांकाची रुग्णवाहिका मूर्ती गावाकडे निघाली. दरम्यान, निंबारी फाट्यानजीक एम.एच.२८-बी-८९०९ या क्रमांकाच्या धावत्या ट्रकने अचानक तत्काळ ब्रेक लावले असता या ट्रकवर पाठीमागून सदर रुग्णवाहिका आदळली. अपघातात रुग्णवाहिकेचा चालक विनोद मुरलीधर बाठे (वय ३५) रा.मलकापूर हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना कळताच नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, शरदचंद्र पाटील, गजानन ठोसर, विलास खर्चे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान जखमी चालक विनोद बाठे यांना दुसऱ्या रुग्णवाहिकेद्वारा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळंके, डॉ. राजपूत मॅडम व चमूने जखमीवर उपचार सुरु केले आहेत.