एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात; १७ मुले जखमी
By निलेश जोशी | Published: September 7, 2023 05:45 PM2023-09-07T17:45:56+5:302023-09-07T17:46:05+5:30
बिबी-मांडवा मार्गावर अपघात
बीबी: लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात होऊन १७ मुले आणि चालक जखमी जााल आहे. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला. जखमींना जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
बीबी येथून एक किलोमीटर अंतरावर मांडवा रोडवर एस टी बस आणि सहकार विद्या मंदिर चे विद्यार्थी शाळेत बीबी येथे घेऊन येत असणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली. गोकुळाष्टमीनिमित्त मुले विविध वेशभुषा करून सहकार विद्यामंदिरामध्ये वाहनाद्वारे जात होते. दरम्यान मांडवा गावानजीक एसटी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शाळकरी मुलांच्या वाहनाची व एसटी बसची धडक झाली. या अपघातामध्ये ६ ते १६ वयोगटातील मुले जखमी झाली असून वाहनाचा चालकही गंभरी जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच बीबी येथील दीपक गुलमोहर यांचे मित्र, सहकारी व ग्रामस्थांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनाद्वारे बीबी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वाहन चालक मात्र या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला मोठ्या प्रयासानंतर वाहनातून बाहेर काढण्यात आले. बीबी ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार करण्यास स्थानिक डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले.
दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मुले जात होती शाळेत
गोकुळाष्टमीनिमित्त शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम होणार होता. त्यामुळे शाळेच्या वाहनातील काही विद्यार्थी कृष्ण ,राधिकेची वेशभूषा करून वाहनात बसले होते. अपघातानंतर त्यांचे डबे, हार आणि पाण्याच्या बॉटल घटनास्थळी तशाच पडून होत्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बीबीचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनीही तत्काळ घटनास्थळ गाठले. बसमध्ये नऊ प्रवाशी होते, असे वाहक आर. टी वनारे यांनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत बस चालकाची वैद्यकी चाचणी करण्यात आली नव्हती.