Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने, २५ जण मृत्यूमुखी

By निलेश जोशी | Published: July 1, 2023 05:52 AM2023-07-01T05:52:04+5:302023-07-01T08:02:57+5:30

Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला.

Accident: Terrible accident on Samriddhi highway, 21 people died as a private passenger bus caught fire | Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने, २५ जण मृत्यूमुखी

Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने, २५ जण मृत्यूमुखी

googlenewsNext

-नीलेश जोशी
सिंदखेड राजा (बुलडाणा): समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी पी. आर. मुसदवाले यांनी दिली.

दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळावर पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पोहोचलेले आहेत. बसमधील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने मृतकांची अेाळख पटवणे अवघड काम झाले आहेत. यासंदर्भात डीएनए टेस्टच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस  पेटली. त्यात प्राथमिक अंदाजानुसार २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ही बस काही काळ कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यु झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

बसमधील प्रवाशांची यादी मागवली
नागपूर येथून या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची यादी मागविण्यात आली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. मात्र मृतकांची अेाळख पटविण्यासाठी डीएनए टेस्टशिवाय पर्याय नसल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ही बस वातानुकुलीत असल्याने अपघातानंतर बसचा दरवाजा लॉक झाला होता. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे दुर्घटनेतील मृतकांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे. बसचा चालक व क्लिनर अपघातानंतर बसचा काच फुटल्याने कसेबसे बाहेर पडू शकले होते. त्यांनीच १०८ रुग्णवाहिकेस फोन केल्यानंतर अपघाताची माहिती मिळाली असल्याची बाब समोर आली आहे.

आवाहन
समृध्दी महामार्गावर आज झालेल्या अपघातासंदर्भात खासगी बस मधील जखमी / मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी  जिल्हाधिकारी बुलढाणा  कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबर वर संपर्क साधावा.

Read in English

Web Title: Accident: Terrible accident on Samriddhi highway, 21 people died as a private passenger bus caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.