पोलिसांना गुन्हे अन्वेषणांत श्वान पथकाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:40 AM2021-09-04T04:40:49+5:302021-09-04T04:40:49+5:30

बुलडाणा : क्लिष्ट आणि तेवढ्याच आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करताना कधी-कधी पोलिसांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. मात्र, याच आव्हानात्मक ...

Accompanying the dog squad in the crime investigation to the police | पोलिसांना गुन्हे अन्वेषणांत श्वान पथकाची साथ

पोलिसांना गुन्हे अन्वेषणांत श्वान पथकाची साथ

Next

बुलडाणा : क्लिष्ट आणि तेवढ्याच आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करताना कधी-कधी पोलिसांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. मात्र, याच आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत मिळते ती श्वान पथकाची. अशाच बुलडाणा पोलीस विभागातील श्वान पथकाने आतापर्यंत पोलिसांना शंभरहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यास मदत केली आहे. सध्याही हे पथक पोलिसांना मोलाची साथ देत आहे.

गुन्हेगार गुन्हा करून जातो. मात्र, कधी-कधी कुठलाही पुरावा नसल्याने त्या गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना अडचणी येतात. मात्र, ही अडचण समजूनच श्वान पथकातील गुन्हे अन्वेषण करणारे श्वान त्या गुन्हेगारांच्या पावलांचा माग घेऊन अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत करतात. त्याचप्रमाणे बुलडाणा पोलीस विभागातील श्वान पथक गुन्हे उघड करण्यात पोलीस विभागाला मोलाची साथ देत असून, या विभागातील चार श्वानांनी आतापर्यंत शंभरहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस विभागाला मदत केली आहे. पथकातील राजा, राणी, एंजल आणि जुली ही चारही श्वान सध्या कार्यरत असून, पुढील काही वर्षे हे चारही श्वान निवृत्तीपर्यंत पोलिसांची मदत करण्यासाठी सज्ज आहेत. चारही श्वानांचे विशेष ट्रेनिंग पूर्ण झाली आहे.

राजा-राणीचे पुण्यात, तर जुलीचे हरियाणात झाले ट्रेनिंग

बुलडाणा पोलीस विभागाच्या श्वान पथकात एकूण चार श्वान आहेत. राजा, राणी, जुली आणि एंजल अशी या श्वानांची नावे असून, राजा आणि राणीचे पुणे गुन्हे अन्वेशन विभाग श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे येथे प्रशिक्षण झाले आहे, तर जुलीचे आयटीबीपी मानू पंचफुला हरियाणा येथे प्रशिक्षण झाले आहे. तर एंजलचे एसएसबी डेरा अलवर, राजस्थान येथे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या श्वानांनी शंभरपेक्षा अधिक गुन्ह्यांचा उलगडा करण्यात मदत केली आहे. यातील श्वान एंजलची महाराष्ट्र कर्तव्य मेळाव्यात निवड झाली होती. मात्र, कोरोनामुळे हा मेळावा होऊ शकला नाही.

राजा बाॅम्ब शोधक तर राणी आणि जुली गुन्हे शोधक

श्वान पथकातील राजा हा श्वान बॉम्ब शोधक आहे. तर राणी आणि जुली हे दोन श्वान गुन्हे शोधक आहेत. एंजल अमली पदार्थ शोधक आहे. जुली या श्वानाने चालू वर्षातील तीन महत्त्वाचे गुन्हे उघड करण्यात मदत केली आहे, हे विशेष.

पोलिसांच्या मागणीनुसार आणि पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी श्वान पथक काम करीत आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांत श्वान पथकाने मार्गदर्शन केले असून, पुढेही अशीच कामगिरी केली जाणार आहे.

-संजय वाढई, पोलीस उपनिरीक्षक, श्वान पथकप्रमुख.

Web Title: Accompanying the dog squad in the crime investigation to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.