जळगाव जामोद येथे पाच देशी कट्ट्यांसह आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:04 PM2020-12-14T12:04:10+5:302020-12-14T12:06:59+5:30
Crime News १५ जिवंत काडतुसे १२ डिसेंबर रोजी रात्री बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मध्य प्रदेशातून जळगाव जामोदमार्गे महाराष्ट्रात देशी कट्टे आणणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला अटक करत त्याच्याकडून पाच देशी कट्टे, १५ जिवंत काडतुसे १२ डिसेंबर रोजी रात्री बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जप्त केली.
स्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यावरून जळगाव जामोद ठाण्याच्या हद्दीतील जळगाव शहरातील बऱ्हाणपूर चौकात नाकेबंदी करण्यात आली. यावेळी एका दुचाकीवर दोघे येत असल्याचे पोलिसांना दिसले. ती दुचाकी थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी एकाने पथकाच्या तावडीतून सुटका करून घेत पळून गेला. अंधार असल्याने जंगलात तो दिसेनासा झाला. यावेळी दुसरा आरोपी बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार तालुक्यातील शेकापूर येथील भोरू भुवानसिंग रावत (वय २५) याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याजवळून मॅगझिनसह पाच देशी कट्टे, १५ जिवंत काडतूस, मोबाइल, दुचाकी असा तीन लाख १४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर शस्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्ह्यातील अवैध शस्र विक्री रोखण्यासाठी गठित केलेल्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम गिते यांनी गठित केलेल्या पथकामध्ये नागेशकुमार चतरकर, नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, अताउल्लाखान, गजानन आहेर, युवराज शिंदे, सतीश जाधव, सरिता वाकाेडे यांचा समावेश आहे.