जंगलाला आग लावणाऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:30 PM2021-03-09T12:30:20+5:302021-03-09T12:31:00+5:30
Crime News मेहबूब खॉ. शमशेर खी पठाण रा.उंद्री यास वनविभागाच्या पथकाने ८ मार्च राेजी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगांव/हरणी वनक्षेत्रात शिकारीसाठी शेकडो हेक्टर जंगल जाणीवपूर्वक पेटवून देणाऱ्या सराईत वनगुन्हेगार मेहबूब खॉ. शमशेर खी पठाण रा.उंद्री यास वनविभागाच्या पथकाने ८ मार्च राेजी अटक केली. त्याच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त केले.
गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने आग लावणाऱ्यांवर लक्ष ठेवले. जंगलांना आग लावणारे वनविभागाच्या रडावर असल्याचे वृत्तही ‘लाेकमत’ने प्रकाशित केले हाेते. ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगांव/हरणी वनक्षेत्रात काही दिवसांपूर्वी आग लागली हाेती. या आगीत जंगलाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते.
शिकारीसाठी शेकडो हेक्टर जंगल जाणीवपूर्वक पेटवून देणाऱ्या सराईत वनगुन्हेगार मेहबूब खॉ.शमशेर खी पठाण रा.उंद्री यास वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक व्ही.जी. साबळे यांचे नेतृत्वाखालील तपास पथकाने साेमवारी रोजी उंद्री शिवारात एका शेतात लपलेल्या ठिकाणाहून अटक केले. त्याच्याकडून दोन माचिस, शिकारीसाठी वापरण्यात येणारे कुऱ्हाड, कोयता व इतर साहित्य जप्त केले. आरोपीने वनगुन्हा कबूल केला आहे. आरोपीच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कार्यवाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे खामगांव परिक्षेत्र, वनपाल नेवरे, वनरक्षक नितेश गवई, राजेंद्र सूर्यवंशी, मुक्ता ताठे व इतर वनमजुरांनी सहभाग घेतला आहे.