घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:07 PM2020-01-25T13:07:11+5:302020-01-25T13:07:26+5:30
एका महिलेनेतर पोलिस कर्मचाºयावर थेट उकळता चहाच फेकल्याने पोलिस कर्मचारी भाजला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अमडापूर, साखरखेर्डा पोलिस ठाण्यासह अन्य काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसह अन्य गुन्हे करणाऱ्या आरोपीस पकडण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीसह त्याच्या साथिदारांनी प्राणघातक हल्ला करून चार पोलिसांना जखमी केल्याची घटना मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा येथे २४ जानेवारी रोजी घडली. दरम्यान, यातील एका महिलेनेतर पोलिस कर्मचाºयावर थेट उकळता चहाच फेकल्याने पोलिस कर्मचारी भाजला आहे.
या घटनेत सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय हिंदुराव मोरे, पोलिस हेडकॉन्सटेबल सुधाकर काळे, पोलिस उपनिरीक्षक अढाव आणि नायक पोलिस कॉन्स्टेबल संजय नागवे हे जखमी झाले आहेत. लोणी लव्हाळा येथील जखमेश्वर शेनफड शिंदे या आरोपी विरोधात अमडापूर आणि साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसह विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.
तो लोणी लव्हाळा येथे त्याच्या गावी आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला भेटली होती. त्याच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या निर्देशानुसार एलसीबीचे पथक आरोपीला पकडण्यासाठी लोणी लव्हाळा येथे गेले होते. दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास जखमेश्वर शिंदे याच्या घरासमोर पोलिस गेले असता जखमेश्वर याने तेथून पलायन केले असता पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर दगडफेक केली. दरम्यान, जखमेश्वरचे वडील शेनफड शिंदे यांनी पोलिसांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. शिवगंगा शिंदे या महिलने पोलिसांवर चक्क उकळता चहा फेकल्याने पोलिस कर्मचारी सुधाकर काळे हे यात भाजल्या गेले.
दरम्यान, आरोपीची पत्नी आरती, रवी याची पत्नी वैशाली आणि जखमेश्वरची बहिण सुनीता भोसले, तीन अनोळखी पुरुष, दोन महिला यांनीही पोलिसांवर दगडफेक करत आरोपीस पळून जाण्यास मदत केली. प्रकरणी या सर्व आरोपी विरोधात साखरखेर्डा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणण्यासह, पोलिस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय हिंदुराव मोरे यांनी दिली असून पुढील तपास आता साखरखेर्डा पोलिस करीत आहेत. २०१८ मध्ये आरोपी जखमेश्वर याने अमडापूर व साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोºया केल्या होत्या.
आरोपीला वाचवण्यासाठी फेकला उकळता चहा
घरफोडीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या जखमेश्वरला पोलिसांच्या तावडीतून वाचविण्यासाठी चक्क त्याची आई शिवगंगा शिंदे हीने चुलीवर उकळत असलेला चहाच पोलिस कर्मचाºयाच्या अंगावर फेकला. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी भाजला आहे. गोपनिय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळीच सव्वा आठ वाजता आरोपीच्या घरासमोर धडकले असता ही घटना घडली. दरम्यान, आरोपीने या घटनाक्रमादरम्यान पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले.