१० महिन्याची मुलगी, पत्नीची हत्या करुन आरोपीची आत्महत्या
By विवेक चांदुरकर | Updated: April 12, 2024 19:57 IST2024-04-12T19:56:50+5:302024-04-12T19:57:01+5:30
या घटनेची माहिती कळताच गावातील नागरिकांनी जांबुळधाबा शिवारात एकच गर्दी केली.

१० महिन्याची मुलगी, पत्नीची हत्या करुन आरोपीची आत्महत्या
मलकापूर : दोन महिन्यांपासून माहेरी असलेल्या पत्नी व १० महिन्याच्या चिमुकल्या मुलीची हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जांबुळधाबा शिवारात १२ एप्रिल रोजी घडली.
तालुक्यातील दुधलगांव बु. येथील रहिवासी विशाल मधूकर झनके (वय ३० वर्षे) याचा काही वर्षांपूर्वी खान्देशातील देऊळगाव गुजरी येथील प्रतिभा नामक मुलीशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला प्रिया (वय २ वर्षे) व दिव्या (वय १० महिने) या दोन मुली होत्या. प्रतिभा झनके गत दोन महिन्यांपासून माहेरी देऊळगाव गुजरी येथे गेली होती.
विशाल झनके याने काही दिवसांपूर्वी सासरी जावून त्याची २ वर्षीय मुलगी प्रिया हिला परत आपल्या घरी आणले होते. शुक्रवारी सकाळी विशाल झनके दुचाकीने सासूरवाडीला गेला. तिथे पत्नीचे आईवडिल घरी नसताना प्रतिभा व चिमुकली दिव्या यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. घटनास्थळावरून तो घरी परतला. दुपारी २ वाजताच्या सुमारास विशाल झनके याने जांबुळधाबा शिवारात स्वतः च्या मालकिच्या शेतातील विहिरीत पायाला दगड बांधून उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेत खान्देशातील फत्तेपूर पोलिस ठाण्यात विशाल झनकेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी त्याच्या आत्महत्या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप काळे करीत आहे. या घटनेची माहिती कळताच गावातील नागरिकांनी जांबुळधाबा शिवारात एकच गर्दी केली.