बालिकेवर बलात्कारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:38 PM2019-09-23T18:38:54+5:302019-09-23T18:39:03+5:30
आरोपी विजय राजु गायकवाड याने बोराखेडी, ता.मोताळा येथील अज्ञान बालिकेला लग्नाचे आमीष देवून पळवून नेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : बोराखेडी येथील बालिकेवर तिला पळवून नेवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विजय राजु गायकवाड यास १० वर्षे सक्त मजुरी व दंड ठोठावण्यात आला आहे. मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एम. जाधव यांनी २३ सप्टेंबररोजी हा निकाल दिला.
आरोपी विजय राजु गायकवाड याने बोराखेडी, ता.मोताळा येथील अज्ञान बालिकेला लग्नाचे आमीष देवून पळवून नेले होते. याबाबत पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी विरूध्द भादंविच कलम ३६३, ३६६, ३७६ तसेच बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलमानुसार गुन्हा क्र.२०/१५ हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासानंतर वि.न्यायालयामध्ये त्यावरून विशेष सत्र खटला क्र.१४/१५ हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता विवेक मा.बापट यांनी ११ साक्षीदार तपासले. या कामी न्यायालयीन पैरवी म्हणून राजेश भंडारी, एएसआय पोलीस स्टेशन बोराखेडी यांनी सहाय्य केले.
या प्रकरणात अंतिम युक्तीवाद पूर्ण होवून आज रोजी न्यायनिर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार आरोपी विजय राजु गायकवाड यास भादंविचे कलम ३६३ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच कलम ३६६ नुसार ७ वर्षे सक्त मजुरी व दंड रक्कम रू. २ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भादंविचे कलम ३७६ नुसार १० वर्षे सक्त मजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद तसेच पोस्को कायद्याचे कलम ४ नुसार १० वर्षे सक्तमजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व दंडाची रक्कम पिडीत बालिकेला नुकसान भरपाई दाखल देण्यात यावी असा आदेश वि. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एम. जाधव यांनी दिला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून विवेक बापट यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)