खून प्रकरणातील आरोपीस अटक
By admin | Published: September 2, 2016 02:27 AM2016-09-02T02:27:27+5:302016-09-02T02:27:27+5:30
आदिवासी वृद्ध महिलेचे खूनप्रकरण; मध्यप्रदेशातील दानपहाडी येथे एकास अटक.
शेगाव(जि. बुलडाणा), दि. १: तालुक्यातील पिंगळी शेतशिवारातील आदिवासी वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणी सोनाळा पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशातील दानपहाडी येथे एकास अटक केली. पिंगळी शिवारातील आदिवासी महिला कलाबाई भास्कर हिच्या खुनानंतर पिंगळी शिवारात कुजलेल्या तसेच अवयव विखुरलेल्या अवस्थेत या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेचे तब्बल २७ दिवसांनी गूढ उकलले होते. यानंतर मंगळवारी सोनाळा पोलिसांनी मृताच्या पतीविरुद्ध कलम ३0२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र आरोपी पती हा फरार होण्यास यशस्वी झाला होता. दरम्यान, या आरोपीच्या शोधार्थ सोनाळा पोलीस स्टेशनचे चार पोलीस कर्मचार्यांचे पथक मध्य प्रदेशात २९ ऑगस्टच्या रात्री रवाना झाले होते. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी आरोपी मधुकर भास्कर याला दुपारी साडे बारा वाजेदरम्यान मध्यप्रदेशातील खकनार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दान पहाडी येऊन आरोपीला अटक करण्यात या पोलीस पथकाला यश आले. या पोलीस पथकामध्ये सोनाळा पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन जोशी, पोकाँ निशांत कळसकर, पोकाँ भाऊ मोरे, महिला पोकाँ पौर्णिमा साने आदींचा समावेश होता. मध्यप्रदेशातील ३८-४0 गावांमध्ये या आरोपींचा शोध घेतल्यानंतर खकनार पो.स्टे. अंतर्गत येत असलेल्या दात पहाडी येथील जंगलातील एका रखवालदाराच्या घरुन अटक करण्यात आली.