अपघातप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
By admin | Published: February 12, 2016 02:02 AM2016-02-12T02:02:20+5:302016-02-12T02:02:20+5:30
वढव येथील विलास राजगुरू मृत्यू प्रकरणी न्यायालयाने खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
लोणार : तालुक्यातील वढव ते मोप रस्त्यावर वढव येथील विलास रामभाऊ राजगुरु मृत अवस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली होती, त्यामुळे या घटनेच्या तपासासाठी अनिता विलास राजगुरु यांनी लोणार येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात धाव घेतली असता, यावर न्यायालयाने लोणार पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. वढव ते मोप रस्त्यावर वासुदेव सोनुने यांच्या शेताजवळ वढव येथील विलास रामभाऊ राजगुरु मृत अवस्थेत आढळून आले होते. यासंदर्भात ७ नोव्हेंबर २0१५ रोजी लोणार पोलीस स्टेशनला अपघात झाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर ९ नोव्हेंबर २0१५ रोजी मृतकाची पत्नी अनिता विलास राजगुरु यांनी लोणार पोलीस स्टेशनला पतीचा अपघात झाल्याच्या नोंदीविरोधात तक्रार दाखल केली. पती विलास राजगुरु यांचा अपघात झाला नसून, त्यांचा खून करण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. त्यामुळे या घटनेचा तपास करावा, अशी मागणी महिलेने केली होती; मात्र अनेक तक्रारींवरून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे अनिता विलास राजगुरु या महिलेने लोणार येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने लोणार पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश ५ फेब्रुवारी २0१६ रोजी दिले आहेत.