रेमडेसिविर प्रकरणातील आरोपीस पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:56+5:302021-05-20T04:37:56+5:30
या प्रकरणात तीनपैकी तीन आरोपींना बुलडाणा न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलडाणा शहरातील दोन नामांकित ...
या प्रकरणात तीनपैकी तीन आरोपींना बुलडाणा न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुलडाणा शहरातील दोन नामांकित रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांनी बनावट रेमडेसिविरची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पोलिसांनी राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे या तिघांना जांभरून रोड आणि येळगाव फेटा येथून अटक केली होती. त्यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनसह रोख सात हजार रुपये, दोन दुचाकी व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बुलडाणा शहर पोलिसांकडे देण्यात आला होता. ८ मे रोजी आरोपींना बुलडाणा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची १० मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. १४ मे रोजी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयाने त्यांना पुन्हा तीन दिवसांची अर्थात १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने राम गडाख यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर अन्य दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी दोन नामांकित रुग्णालयापैकी एका रुग्णालयातील डॉक्टराचाही जबाब घेतला असल्याची माहिती प्रकरणाचे तपासी अधिकारी एपीआय अभिजित अहिरराव यांनी दिली.