ई-फेरफारमध्ये अमरावती विभाग राज्यात दुसरा; अचलपूर तहसील प्रथम
By सदानंद सिरसाट | Published: June 17, 2024 07:04 PM2024-06-17T19:04:11+5:302024-06-17T19:04:53+5:30
राज्यात सरासरी २० दिवसांचा कालावधी घेत नाशिक विभाग प्रथम क्रमांकावर आहे.
खामगाव (बुलढाणा) : जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी सात-बारा तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी फेरफार रुजू केला जातो. शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शीपणे करण्यासाठी ई-फेरफार प्रणाली सुरू केली. त्यासाठी कायद्यानुसार कालावधी ठरलेल्या कालावधीतच किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात फेरफार रुजू करण्याच्या प्रक्रियेतील सरासरी दिवसांची संख्या पाहता अमरावती विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या विभागात अचलपूर तहसील प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात सरासरी २० दिवसांचा कालावधी घेत नाशिक विभाग प्रथम क्रमांकावर आहे.
सातबारा फेरफार हा सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचा दस्त. पूर्वी हा सातबारा हस्तलिखित होता. केंद्र सरकारने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला. जमीन व्यवस्थापन पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज ओळखून सर्व सात-बारा जमीन नोंदीचे संगणकीकरण केले. त्यामध्ये खरेदी दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंध कार्यालय जोडण्यात आले. या प्रक्रियेत दुय्यम निबंधकाकडे झालेले खरेदी व्यवहार थेट संबंधित जमिनीचा फेरफार रुजू करण्यासाठी तहसीलच्या यंत्रणेकडे आॅनलाइन दिसू लागले. त्या व्यवहारांच्या फेरफाराच्या माध्यमातून नवीन सातबारा नोंदी सुरू झाल्या.
- ठराविक कालावधीकडे लक्ष
व्यवहाराची दस्त नोंद झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय ते तहसील कार्यालयात पुढील प्रक्रियेचे काम किती दिवसात होते, याचे पर्यवेक्षण महसूल विभागाकडून केले जात आहे. महाभूमी प्रकल्पांतर्गत ई फेरफार प्रणालीवर एखाद्या नागरिकांनी दस्त नोंद दिल्यानंतर किती दिवसांत सातबारा मिळाला, यावरून सरासरी दिवस निश्चित केले आहेत.
- अमरावती विभागातच वेळेतच सात-बारा
ठरवून दिलेल्या कालावधीत म्हणजे, २१ दिवसांतच अमरावती विभागात सात-बारा तयार होत आहे. तर अमरावती विभागात अचलपूर तालुका प्रथम स्थानावर आहे. या तहसीलमध्ये सरासरी १८ दिवसांतच फेरफाराची नोंद होऊन सात-बारा तयार केला जात आहे.
सर्वच पातळीवर प्रशासन हे गतिमान असावे, ही सर्वसामान्यांच्या अपेक्षेसह शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न आहे. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे - डॉ. संजय गरकल, तहसीलदार, अचलपूर
सर्वसामान्यांची कामे वेळेतच व्हावी, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सातत्याने आढावा घेण्यात येतो. सेवा वेळेत मिळत आहेत, याचा आनंद आहे - शामकांत मस्के, सहायक आयुक्त, भूसुधार, अमरावती.