मनोरूग्णावर अॅसीड हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:16 PM2019-07-12T13:16:05+5:302019-07-12T13:16:11+5:30
एका मनोरूग्णावर अज्ञात समाजकंटकांनी अॅसीड टाकल्याचा संतापजनक प्रकार १० जुलै रोजी उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे एका मनोरूग्णावर अज्ञात समाजकंटकांनी अॅसीड टाकल्याचा संतापजनक प्रकार १० जुलै रोजी उघडकीस आला आहे. या अॅसीड हल्ल्यात सदर मनोरूग्ण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे. शेळगाव आटोळ येथील काही सुजान ग्रामस्थांनी तातडीने त्यास बुलडाणा येथे उपचारार्थ हलविले आहे. दरम्यान, या प्रकाराने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे काही दिवसांपासून एक मनोरूग्ण व्यक्ती राहत आहे. कुणाला त्रास नाही, कुणाला शिवीगाळ नाही, आपल्याच धुंदीत तो राहत होता. मात्र, ९ जुलैच्या रात्री काही अज्ञात लोकांनी त्याच्या अंगावर बॅटरीतील अॅसिड ओतले. यामध्ये त्याच्या पाठीचा भाग व दोन्ही हात भाजले आहेत. १० जुलैच्या सकाळी गावातील अनिल जºहाडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी सेवासंकल्पचे नंदकुमार पालवे यांना माहिती दिली व मनोरूग्णास उपचारार्थ रूग्णालयात ग्रामस्थांच्या मदतीने हलवले. ग्रामस्थांनी वर्गणी करून तातडीने काही रक्कम उभी केली व रुग्णवाहिका बोलावून त्यास बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी बेवारस रूग्णांचे मायबाप म्हणून ओखल्या जाणारे डॉ.विजय निकाळे हे त्याच्यावर उपचार करत आहेत. शेळगाव आटोळ येथील भारत बोर्डे, सर्जेराव जाधव, प्रकाश बोराडे, सागर आराख, अंकुश आटोळे, गणेश घोडके, दौलत जेठे, लिंबा आरक, सागर बोर्डे, शरद सुरकर, गुलाब जाधव, संतोष उत्तम बोराडे व इतर ग्रामस्थांनी मनोरूग्णाप्रती आस्था दर्शवित माणूसकीचे दर्शन घडवून दिले आहेत. दरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयातील उपचाराअंती पुढील जबाबदारी नंदकुमार पालवे यांनी स्वीकारली असून उपचाराची दिशा ठरल्यानंतर सदर मनोरूग्णास सेवासंकल्प वर दाखल केले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)