१४ गावांची भिस्त अधिग्रहणावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:50+5:302021-04-06T04:33:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : वाढत्या उन्हाच्या तडाख्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही गंभीर होत आहे. यामध्ये तालुक्यातील ४० गावे संभाव्य पाणीटंचाईत येत असल्याने त्यानुषंगाने प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुषंगाने गत जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत १४ गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण केले असून, यातील दोन गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्तोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा असल्याने तालुक्याला गत वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कमी सोसावी लागणार आहे. असे असले तरी सुमारे ४० गावांचा पाणीपुरवठ्यावर यंदाच्या उन्हाळ्यात परिणाम होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत १४ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने ९ गावांसाठी विहिरींचे, तर ४ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्यता असली, तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. यानुषंगाने सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या गावांत तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी दोन गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यानुषंगाने ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताच पंचायत समितीच्या वतीने विहिरी व बोअरच्या अधिग्रहणाची कारवाई करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेले गाव
तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, साकेगाव, तोरणवाडा, खैरव, नगर या नऊ गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर पेठ, डासाळा, खोर व बोरगाव काकडे या चार गावांमध्ये बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
दोन गावांना टँकरचा आधार !
तालुक्यातील असोला बु. आणि भोगावती-सैलानी नगर येथे सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्याची समस्या उग्र झाली असल्याने याठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यानुषंगाने असोला बु. येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठी भरोसा शिवारातील विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून, या अधिग्रहित विहिरीवरून टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा होत आहे, तर भोगावती-सैलानी नगर भागास खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
..............................