धरण उशाला, कोरड घशाला; २१ गावांसाठी २८ विहिरींचे अधिग्रहण

By ब्रह्मानंद जाधव | Published: May 9, 2023 04:38 PM2023-05-09T16:38:45+5:302023-05-09T16:39:05+5:30

तहसील प्रशासनाकडून अद्याप पर्यंत नऊ विहिरींचे आदेश अप्राप्त आहेत. तालुक्यातील धोत्रा नंदाई आणि गोळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता पंचायत समिती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Acquisition of 28 wells for 21 villages in buldhana | धरण उशाला, कोरड घशाला; २१ गावांसाठी २८ विहिरींचे अधिग्रहण

धरण उशाला, कोरड घशाला; २१ गावांसाठी २८ विहिरींचे अधिग्रहण

googlenewsNext

देऊळगाव राजा : खडकपूर्णा धरणातून इतर जिल्ह्यांची तहान भागविणारा देऊळगाव राजा तालुकाच तहानला आहे. तालुक्याला पाणीटंचाईचे चटके बसत असल्याने सध्या धरण उशाला, कोरड घशाला, असे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील ६० गावांपैकी २१ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रशासनाने २८ विहिरी अधिग्रहण केल्या आहेत.

तहसील प्रशासनाकडून अद्याप पर्यंत नऊ विहिरींचे आदेश अप्राप्त आहेत. तालुक्यातील धोत्रा नंदाई आणि गोळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता पंचायत समिती प्रशासनाने व्यक्त केली आहे. मे महिन्याच्या प्रथम पंधरवड्यातच पाणी टंचाईची दाहकता निर्माण झाली आहे. तालुक्यात सर्वात मोठे जलस्त्रोत असलेल्या खडकपूर्णा धरणाचा जलसाठा अद्यापपर्यंत मोठ्या प्रमाणात असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वय अभावी त्याचा तालुक्याला काहीही उपयोग होत नाही. या धरणावरून बाहेर जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये जल वाहिन्या टाकण्यात आल्या नसल्यामुळे दरवर्षी या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावांसाठी दरवर्षी खासगी विहिरीचे अधिग्रहण पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला करावे लागते. यावर लाखो रुपये खर्च प्रशासनाचा होतो. परंतु खडकपूर्णा धरणातून कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास हा खर्च वाचू शकतो. ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

या ठिकाणी झाले विहिरींचे अधिग्रहण 

पंचायत समितीकडून २१ गावांमध्ये एकूण २८ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये भिवगाव बु., अंढेरा येथे सहा विहिरी, बोराखेडी बावरा, पळसखेड झाल्टा, किनी पवार, वाणेगाव, तुळजापूर, डोढ्रा, पिंपळगाव बु., गिरोली बु., गिरोली खुर्द, खल्याळगव्हाण, सिनगाव जहागीर या गावांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पंचायत समिती येथे पाणीटंचाई निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतकडून विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव सादर होताच तत्काळ प्रशासनाकडून मंजुरी देण्यात येते.
-व्ही. बी. सावळे, पाणीटंचाई कक्ष प्रमुख, पंचायत समिती, देऊळगाव राजा.

Web Title: Acquisition of 28 wells for 21 villages in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.