बुलडाणा जिल्ह्यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:15 PM2021-06-26T12:15:13+5:302021-06-26T12:15:19+5:30
Action against 135 gutka sellers in Buldana district : १२ लाख १४ हजार ५५३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तीन दिवस विशेष मोहिम राबवत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येवून १२ लाख १४ हजार ५५३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन प्रमुखांनी आपापल्या हद्दित तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात २२ जून ते २४ जून दरम्यान गुटखा विरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत एलसीबीच्या वेगवेगळ्या पथकांनी उपरोक्त कालावधीत नांदुरा, देऊळगाव राजा, बुलडाणा, चिखली, बिबी व साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दित एकुन ११ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये एकुन सहा लाख १६ हजार ५६६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तर स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दित केलेल्या १२४ कारवायांमध्ये ५ लाख ९७ हजार ९६७ रुपयांचा गुटखा जप्त केला. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला़