खामगावात २७ दुचाकी धारकांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:20 PM2020-04-07T18:20:34+5:302020-04-07T18:20:43+5:30
शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी मंगळवारी २७ दुचाकी धारकांवर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने संचारबंदी लावण्यात आली. शहरात दुचाकींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरी देखील दुचाकींचा वापर होत असल्याने, शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी मंगळवारी २७ दुचाकी धारकांवर कारवाई केली.
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यस्थितीत ११ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत बाहेरगावच्या नागरिकांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून दुचाकी वाहने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील शहरात दुचाकींचा वापर थांबत नसल्याने शहर पोलिस स्टेशनसमोर आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशन समोर तब्बल २७ दुचाकींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
दुचाकी धारकांना दंडुक्याचा प्रसाद!
संचारबंदी काळात दुचाकीवर विनाकारण फिरणाºया डबलसीट धारकांना पोलिसांनी चांगलेच धारेवर धरले. अनेकांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला. काही दुचाकी धारकांना उठबशांचीही शिक्षा देण्यात आली.