बेलगावातील बोगस डॉक्टराविरोधात कारवाई; रुग्णालय सील
By निलेश जोशी | Published: January 3, 2024 08:21 PM2024-01-03T20:21:29+5:302024-01-03T20:21:44+5:30
वैद्यकीय परवाना ही त्यांच्याकडे नव्हता. यासोबतच डॉक्टर असल्यासंदर्भातील अन्य कागदपत्रेही त्यांच्याकडे सापडली नाही.
डोणगांव : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच बेलगाव येथील कथितस्तरावरील बोगस डॉक्टरचे रुग्णालयही सील करण्यात आले आहे. ही कारवाई ३ जानेवारी रोजी करण्यात आली.
बेलगाव येथे एक जण डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर डोणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रंणजीत मंडाले, गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर घायाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. बेलगाव येथे कथित डॉक्टर श्रीकृष्ण बन्सोड (रा. लोणार, ह. मु. बेलगाव) यांच्या रुग्णालयाचीही या पथकाने झडती केली असता त्यांच्या जवळ अनधिकृत इंजेक्शन व औषधी मिळून आली.
वैद्यकीय परवाना ही त्यांच्याकडे नव्हता. यासोबतच डॉक्टर असल्यासंदर्भातील अन्य कागदपत्रेही त्यांच्याकडे सापडली नाही. त्यामुळे या पथकाने त्यांचा दवाखाना सील केला. सोबतच कथित डॉक्टर बन्सोड यांना डोणगाव येथे आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांच्या तक्रारीवरून श्रीकृष्ण बन्सोड यांच्या विरोधात फसवणूक करणे, तसेच कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना डॉक्टरी व्यवसाय केल्याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे हे करीत आहेत. या कारवाईमुळे डोणगाव परिसरात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येत्या काळात आणखी काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता आहे.